वृत्तसंस्था/ रोम
पावसाचा व्यत्यय आलेल्या सामन्यात जागतिक अग्रमानांकित नोव्हॅक जोकोविचने विजय मिळवित इटालियन ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱया फेरीत स्थान मिळविले. दुसऱया सेटवेळी पाऊस सुरू झाल्यानंतरही चेअर अंपायरनी सामना सुरूच ठेवल्यामुळे जोकोविच खूपच चिडल्याचे दिसून आले.
‘अजून किती वेळ सामना सुरू ठेवणार? असे रागानेच त्याने पंचांना विचारले. मी तुम्हाला तीनदा विचारलो. पण तुम्ही त्याची दखलही घेतली नाही,’ असे चिडून त्याने म्हटले. नंतर सामना जवळपास तीन तास थांबवण्यात आला. त्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाल्यानंतर जोकोविचने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झवर 6-3, 7-6 (7-5) अशी मात करीत आगेकूच केली. पावसामुळे पुरुषांचे उर्वरित सामने रद्द करण्यात आले.
गेल्या वर्षी एका महिला लाईन जजला चुकून चेंडू मारल्यामुळे जोकोविचला अमेरिकन ओपन स्पर्धेतून अपात्र ठरविण्यात आले होते. पाब्लो कॅरेनो बुस्टाविरुद्ध चौथ्या फेरीच्या सामन्यावेळी ही घटना घडली होती. जोकोविचने रोममधील स्पर्धा आतापर्यंत पाच वेळा जिंकली आहे. त्याची पुढील लढत ब्रिटनचा कॅमेरॉन नोरी किंवा स्पेनचा अलेजान्ड्रो डेव्हिडोविच फोकिना यापैकी एकाशी होणार आहे.









