वृत्तसंस्था/ मुंबई
रणजी चषक स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात मुंबईला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ अशी ख्याती असलेल्या मुंबईवर 10 गडी राखून रेल्वेने दणदणीत विजय मिळवला. यामुळे बलाढय़ कर्नाटकविरुद्ध आगामी रणजी सामन्यात कसोटी ‘स्पेशालिस्ट’ अजिंक्मय रहाणेसोबतच युवा फलंदाज सर्फराज खानही मुंबईकडून खेळणार असल्याचे निवड समितीने स्पष्ट केले.
गत आठवडय़ात रेल्वेविरुद्ध सामन्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे यांच्यावर टीका झाली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचे कोणतेही सामने नसताना भारताचे हे दोन खेळाडू मुंबईकडून खेळले नव्हते. आता, 5 जानेवारीपासून भारताची श्रीलंकेविरूद्धची मालिका सुरु होणार असल्याने हे दोघेही मुंबई संघासाठी उपलब्ध नसतील. यामुळे कर्नाटकविरुद्धच्या सामन्यासाठी अजिंक्य रहाणे, सर्फराज खान यांना संघात स्थान देण्यात आले आहे. मागील दोन सामन्यात रहाणेला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. यामुळे कर्नाटकविरुद्ध सामन्यात त्याला सूर गवसणार का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
मुंबई रणजी संघ – सूर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्य तरे (उपकर्णधार), अजिंक्मय रहाणे, पृथ्वी शॉ, सर्फराज खान, शुभम रांजणे, आकाश पारकर, सिद्धेश लाड, शाम्स मुलानी, विनायक भोईर, शशांक आतार्डे, रॉयस्टन डायस, तुषार देशपांडे, दीपक शेट्टी, एकनाथ केरकर.









