वृत्तसंस्था/ धर्मशाला
हिमाचल प्रदेश विरूद्ध येथे सुरू असलेल्या रणजी स्पर्धेच्या ब गटातील सामन्यात सोमवारी खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर मुंबईने पहिल्या डावात 5 बाद 372 धावा जमविल्या. सलामीचा फलंदाज सर्फराज खान 226 धावा खेळत आहे.
या सामन्यात मुंबई संघाच्या पहिल्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. त्यांची स्थिती 3 बाद 16 अशी केविलवाणी होती. हिमाचल प्रदेश वैभव अरोराने मुंबईच्या जय बिस्त आणि लालवाणी यांना अनुक्रमे 12 आणि एका धावेवर बाद केले. त्यानंतर केडी सिंगने हार्दिक तेमोरेला 2 धावांवर बाद केले. दरम्यान सर्फराज खानने लाडसमवेत चौथ्या गडय़ासाठी 55 धावांची भागिदारी केली. धवनने लाडला 20 धावांवर त्रिफळाचीत केले. उपाहारावेळी मुंबईने 4 बाद 118 धावा जमविल्या होत्या.
उपाहारानंतर सर्फराज आणि कर्णधार आदित्य तरे यांनी पाचव्या गडय़ासाठॅ 143 धावांची भगिदारी करून संघाचा डाव सावरला. तरेने 62 धावांचे योगदान दिले. चहापानावेळी मुंबईने5 बाद 260 पर्यंत मजल मारली. सर्फराज खान आणि शुभम रांजणे यांनी सहाव्या गडय़ासाठी अभेद्य 158 धावांची भागिदारी केली आहे. दिवसअखेर मुंबईने 75 षटकांत 5 बाद 372 जमविल्या. सर्फराज खान 4 षटकार आणि 32 चौकारांसह 226 तर रांजणे 44 धावांवर खेळत आहे. या स्पर्धेतील उत्तरप्रदेश विरूद्ध झालेल्या रणजी सामन्यात सर्फराजने नाबाद द्विशतक झळकविले होते. आता तो या स्पर्धेत सलग दुसरे त्रिशक झळकविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
संक्षिप्त धावफलक- मुंबई प. डाव 75 षटकांत 5 बाद 372 (सर्फराज खान खेळत आहे 226, आदित्य तरे 62, लाड 20, रांजणे खेळत आहे 44, अरोरा 2-28)
रेल्वे प. डाव- 6 बाद 98 (घोष खेळत आहे 32, कर्नाटकातर्फे जैन 4-14, मिथुन 2-18),
बडोदा प.डाव-सर्वबाद 154 (देवधर 52, युसूफ पठाण 34, उनादकट 6-34, मंकड 3-17),
सौराष्ट्र प डाव- 6 बाद 114, मध्यप्रदेश प डाव- सर्वबाद 230 ( दुबे 70, रोहेरा 42, सौरभकुमार 3-59, रजपूत 3-74), उत्तरप्रदेश प डाव- 3 बाद 22.









