वार्ताहर / सरूड
सरूड (ता. शाहूवाडी) येथे बिरोबाच्या माळ जनावरांच्या वस्तीवर बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. सरूड परिसरात आठवड्याभरात दुसऱ्यांदा झालेल्या कुत्र्यावरील हल्ल्यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. वन विभागाने वेळीच या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
सरूड गावच्या पूर्व दिशेला बिरोबाचा माळ या नावाने जनावरांच्यासाठी मोठी वस्ती आहे. या ठिकाणी बाजीराव काळे यांच्या जनावरांच्या शेडमधील पाळीव कुत्र्यावर रात्री एकच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून कुत्रे फस्त केले आहे. कुत्र्याचा निम्मा भाग बिबटयाने खाऊन फस्त केला आहे. पाच दिवसांपूर्वी वारणा कापशी येथे देखील बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला झाला होता. सरूडसह वारणा नदीकाठावरील दहा गावांच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे सिद्ध झाले आहे. जनावरांच्या वस्तीवरील पाळीव कुत्र्यांवर होणार्या बिबट्याच्या हल्ल्यात सातत्याने वाढ होत आहे. बिरोबाच्या माळावर जनावरांच्या साठी मोठी वस्ती असल्या कारणाने लोकांची ये-जा देखील मोठ्या प्रमाणात चालू असते. खरीप हंगामातील शेतीची पेरणीसाठी शेतीच्या मशागतीसाठी शेतकरी वर्गाची लगबग सुरू आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळीच्या सत्रात लोकांना व कुटुंबियांना कामासाठी शेतात जावे लागते. बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे शेतकरीवर्गात घबराटीचे वातावरण आहे. वनविभागाने सदर घटनेची गंभीर दखल घेणे अतिशय गरजेचे आहे. पुढील काळात दुर्देवी घटना घडण्यापूर्वी बिबटयाचा माग काढून त्याला वेळीच बंदीस्त करण्याची आग्रही मागणी परिसरातील नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.