आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप
वृत्तसंस्था / अलमाटी
भारताच्या सरिता मोरने आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 59 किलो गटाच्या अंतिम लढतीत आक्रमक खेळ करीत जबरदस्त मुसंडी मारली आणि सलग 9 मिळवित सलग दुसऱयांदा जेतेपद पटकावले. सीमा बिसलाने 50 किलो गटात तर पूजाने 76 किलो गटात कांस्यपदक मिळविले.
2020 मध्ये नवी दिल्लीत झालेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सरिता मोरने सुवर्णपदक पटकावले होते. येथे झालेल्या अंतिम लढतीत ती मंगोलियाच्या शूवडोर बातारजावविरुद्ध 1-3 अशा गुणांनी मागे पडली होती. सर्कलच्या टोकावर असताना एक चाल करताना सरिताचा तोल गेल्याने शूवडोरला एक गुण मिळाला. पण शूवडोरच्या प्रशिक्षकांनी या निर्णयाला आव्हान देत 4 गुण मिळविले. त्यामुळे शूवडोरने 1-7 अशा गुणांनी झेप घेतली. यानंतर मात्र सरिताने मागे वळून पाहिले नाही. तिने शूवडोरला एकदा खाली घेतले, त्यानंतर एक्स्पोज केले आणि पुन्हा एकदा सर्कलच्या एजवर तिला खाली घेत 7-7 अशी बरोबरी साधली. वेळ संपत आल्याने मंगोलियाच्या कँपने शेवटच्या गुणाला आव्हान दिले. पण ते त्यांच्या विरुद्ध गेल्याने सरिताला जादा गुण मिळाला. सरिताने अखेर ही लढत 10-7 अशा गुणांनी जिंकून जेतेपद स्वतःकडेच राखले.
विशेष म्हणजे पहिल्या लढतीत सरिताला शूवडोर बातारजावकडून 4-5 अशा निसटत्या फरकाने पराभव पत्करावा लागला होता. पण दुसऱया फेरीत तिने जोरदार मुसंडी मारत कझाकच्या डायना कयुमोव्हावर तांत्रिक सरसतेच्या आधारे विजय मिळविला. उपांत्य फेरीत किर्गिझस्तानच्या नुरायदा अनारकुलोवाविरुद्ध सरिताने प्रारंभापासूनच आक्रमक खेळ केला. नंतर तिचा ताबा मिळाल्यानंतर सरिताने जलद हालचाली करून एक्स्पोज मूव्हवर लढत संपवली. शूवडोरविरुद्ध तिला मागील पराभवाची परतफेड करण्याची संधी मिळाली आणि ती साधण्यात तिने यशही मिळविले.
50 किलो गटाच्या कांस्यपदकाच्या लढतीत सीमाने तैपेईच्या युंग सुन लिनला तांत्रिक सरसतेच्या आधारे हरवून कांस्य पटकावले. 76 किलो वजन गटाच्या कांस्यपदाच्या लढतीत पूजाने कोरियाच्या सेयेऑन जेआँगचा 5-2 अशा गुणांनी पराभव करून कांस्य मिळविले. 68 किलो वजन गटात निशा दोन्ही लढतीत चितपट झाली. कोरियाच्या यून सुन जेआँगने तिच्यावर 6-0 अशी मात केली.









