वृत्तसंस्था/ रेनगीओरा (न्यूझीलंड)
आयसीसी महिलांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेपूर्वी येथे रविवारी खेळविण्यात आलेल्या सरावाच्या सामन्यात हरमनप्रित कौर आणि राजेश्वरी यांच्या शानदार कामगिरीमुळे भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेवर केवळ दोन धावांनी निसटता विजय मिळविला. या सामन्यात हरमनप्रित कौरने 11 चौकारांसह 114 धावा तर राजेश्वरी गायकवाडने 46 धावांत 4 गडी बाद केले.
या सरावाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने 50 षटकांत 9 बाद 244 धावा जमविल्या. हरमनप्रित कौरने 19 चेंडूत 114, यास्तिका भाटियाने 58 धावा झळकविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या खाकाने 23 धावांत 3 गडी बाद केले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 7 बाद 242 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या वूलव्हर्टने 75, लुसने 94 धावा जमविल्या. भारताच्या राजेश्वरी गायकवाडने 4 गडी बाद केले. हरमनप्रित कौरला तब्बल 12 महिन्यानंतर फलंदाजीचा सूर मिळाल्याचे जाणवते. न्यूझीलंडमध्ये महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला मार्चमध्ये प्रारंभ होणार असून भारताचा या स्पर्धेतील सलामीचा सामना पाक बरोबर 6 मार्च रोजी खेळविला जाणार आहे.
रविवारी झालेल्या सरावाच्या सामन्यात भारतीय संघातील सलामीची फलंदाज स्मृती मानधना हेल्मेटला आघात होऊन जखमी झाल्याने तिला मैदान सोडावे लागले. दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईलचा उसळता वेगवान चेंडू स्मृती मानधनाच्या हेल्मेटवर आदळला. यानंतर तिला मैदान सोडावे लागले. तिची दुखापत विशेष गंभीर स्वरूपाची नसल्याचे सांगण्यात आले.
रविवारी झालेल्या दुसऱया एका सरावाच्या सामन्यात पाकने यजमान न्यूझीलंडचा 4 गडय़ांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा डाव 45 षटकांत 229 धावांत आटोपला. न्यूझीलंडतर्फे सॅटरवेटने 80, ग्रीनने 58 धावा जमविल्या. पाकच्या संधूने 32 धावांत 4 गडी बाद केले. त्यानंतर पाकने 49.2 षटकांत 6 बाद 233 धावा जमविल्या. अलिया रियाजने 62 तर दारने 54 धावा झळकविल्या. न्यूझीलंडच्या जेस कौरने 30 धावांत 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः भारत 50 षटकांत 9 बाद 244 (हरमनप्रित कौर 114, भाटिया 58, खेका 3-23), दक्षिण आफ्रिका- 50 षटकांत 7 बाद 242 (वूलव्हर्ट 75, लुस 94, गायकवाड 4-46)
न्यूझीलंड 45 षटकांत सर्वबाद 229 (सॅटरवेट 80, ग्रीन 58, संधु 4-32), पाक 49.2 षटकांत 6 बाद 233 (रियाज 62, दार 54, कौर 2-30).









