वृत्तसंस्था/ सिडनी
शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील तीन दिवसांच्या प्रकाशझोतातील दुसऱया सराव सामन्यात जसप्रित बुमराहने अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन घडविताना नाबाद अर्धशतक आणि 2 बळी मिळविले. या सामन्यात खेळाच्या पहिल्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलिया अ वर 86 धावांची आघाडी मिळविली. पावसामुळे काही मिनिटांचा खेळ वाया गेला.
या सरावाच्या सामन्यात पहिला दिवस गोलंदाजांनी गाजविला. दिवसभरात 20 गडी बाद झाले. भारताचा पहिला डाव 48.3 षटकात 194 धावांत आटोपला. प्रथमश्रेणी सामन्यात बुमराहने आपले पहिले अर्धशतक झळकविले. त्याने 57 चेंडूत 6 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 55 धावा झोडपल्या. 27 वषीय बुमराहने सदरलँडच्या उसळत्या चेंडूवर षटकार खेचत आपले अर्धशतक पूर्ण केले. बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी शेवटच्या गडय़ासाठी 71 धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. कर्णधार रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पृथ्वी शॉने 40 तर शुभम गिलने 43 धावा जमविल्या. साहाला खाते उघडता आले नाही तर पंत 5 धावांवर बाद झाला. मयांक अगरवाल आणि हनुमा विहारी यांनाही अधिक धावा जमविता आल्या नाहीत. ऑस्ट्रेलिया अ संघातील विल्डरमुथने 13 धावात 3 गडी बाद केले.
त्यानंतर बुमराह आणि शमी तसेच सैनी यांच्या भेदक माऱयापुढे ऑस्ट्रेलिया अ संघाचा पहिला डाव 32.2 षटकात 108 धावात आटोपला. ऑस्ट्रेलिया अ संघातील कॅरेने एकाकी लढत देत 32 धावा केल्या. मोहम्मद शमीने 29 धावात 3, नवदीप सैनीने 19 धावात 3 तर बुमराहने 2 गडी बाद केले. भारताने दिवसअखेर ऑस्ट्रेलिया अ वर 86 धावांची आघाडी मिळविली.
ग्रीनला कन्कशन
पहिल्या सराव सामन्यात शतक झळकवणारा अष्टपैलू ग्रीनला पहिल्या कसोटीत स्थान मिळण्याची शक्यता आहे. पण गोलंदाजी करताना बुमराहने मारलेला स्ट्रेटड्राईव्ह ग्रीनला चुकविता आला नाही. त्यामुळे चेंडू त्याच्या डोक्याला जोरात आदळल्यानंतर तो खाली बसला. नॉनस्ट्रायकरवर असणाऱया मोहम्मद सिराजनेही त्याच्याकडे धाव घेत त्याची चौकशी केली. सिराजच्या या कृतीने मात्र नेटिझन्सची मने जिंकली आहेत. संघाच्या मेडिकल स्टाफने त्याची त्वरित प्राथमिक तपासणी केल्यानंतर तो उठून बसला आणि चालतच मैदानाबाहेर गेला. तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून कन्कशन बदली खेळाडू म्हणून त्याच्या जागी पॅट्रिक रो याला ऑस्ट्रेलिया अ संघात घेण्यात आले आहे. पहिल्या सराव सामन्यातही पुकोवस्की चेंडू लागून जखमी झाला होता.
संक्षिप्त धावफलक : भारत प. डाव- 48.3 षटकात सर्वबाद 194 (बुमराह 55, गिल 43, शॉ 40, वेल्डरमुथ 3/13), ऑस्ट्रेलिया अ प. डाव- 32.2 षटकात सर्वबाद 108 (कॅरे 32, शमी 3/29, सैनी 3/19, बुमराह 2/33, सिराज 1/26).