वृत्तसंस्था/ सिडनी
येथे सुरू असलेल्या पहिल्या सरावाच्या सामन्यात सोमवारी खेळाच्या दुसऱया दिवशी ऑस्ट्रेलिया अ संघाने भारत अ संघाविरुद्ध पहिल्या डावात 8 बाद 286 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलिया अ संघातील कॅमेरून ग्रीनने शानदार शतक झळकविले. तत्पूर्वी भारत अ संघाने आपला पहिला डाव 9 बाद 247 धावांवर घोषित केला. अजिंक्मय रहाणे 117 धावांवर नाबाद राहिला.
कसोटी मालिकेपूर्वी हा पहिला सरावाचा सामना खेळविला जात आहे. या सामन्यात अजिंक्मय रहाणेला फलंदाजीचा सूर गवसल्याचे दिसून आले. भारत अ संघाने आपला पहिला डाव 9 बाद 247 धावांवर घोषित केला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया अ च्या पहिल्या डावाला सुरुवात झाली. उमेश यादव आणि मोहम्मद सिराज यांची गोलंदाजी प्रभावी ठरली. उमेश यादवने 44 धावात 3 तर मोहम्मद सिराजने 71 धावात 2 गडी बाद केले. रविचंद्रन अश्विनने 58 धावात 2 बळी घेतले. उमेश यादवने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत आपल्या तिसऱया आणि चौथ्या षटकामध्ये नव्या चेंडूवर ऑस्ट्रेलिया अ संघाची सलामीची जोडी पुकोव्हस्की (1) आणि बर्न्स (4) बाद केली. दरम्यान, अष्टपैलू कॅमेरून ग्रीनने आक्रमक आणि तंत्रशुद्ध फलंदाजी करत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 173 चेंडूत नाबाद 114 धावा झळकविल्या. ग्रीनने टीम पेनसमवेत सहाव्या गडय़ासाठी 104 धावांची भागिदारी केली. तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया अ संघाची स्थिती 5 बाद 98 अशी केविलवाणी झाली होती. पेनने 44 धावांचे योगदान दिले. कर्णधार हेड आणि हॅरिस यांनी 55 धावांची भागिदारी केली. हेडने 18 तर हॅरिसने 35 धावा जमविल्या.
कसोटी सामन्यासाठी बुमराह आणि मोहम्मद शमी यांना साथ देण्यासाठी तिसऱया गोलंदाजाकरता आता सिराज आणि उमेश यादव यांच्यात चुरस चालू आहे. फिरकी गोलंदाज अश्विनने मॅडिनसनला 23 धावांवर बाद केले. चहापानावेळी ऑस्ट्रेलिया अ संघाने 5 बाद 186 धावांपर्यंत मजल मारली होती. चहापानानंतरच्या शेवटच्या सत्रात मोहम्मद सिराजने पॅटिनसनला 3 धावांवर बाद केले. मायकेल नेसरने 33 धावा जमविल्या. तो धावचीत झाला. शतकवीर ग्रीनला 24 धावांवर असताना हनुमा विहारीने तर त्यानंतर 78 धावांवर यष्टीरक्षक साहाने जीवदान दिले होते.
संक्षिप्त धावफलक
भारत अ प. डाव- 9 बाद 247 (डाव घोषित), अजिंक्मय रहाणे नाबाद 117, ऑस्ट्रेलिया अ प. डाव- 8 बाद 286 (कॅमेरून ग्रीन खेळत आहे 114, नेसर 33, हॅरिस 35, पॅटिनसन 3, हेड 18, मॅडिनसन 23, यादव 3/44, मोहम्मद सिराज 2/71, अश्विन 2/58).









