ऑनलाईन टीम / पणजी :
नौदलाचे ‘मिग 29 के’ हे लढाऊ विमान सरावादरम्यान गोवा येथील अरबी समुद्रात कोसळले. आज सकाळी 10.30 च्या सुमारास अपघात झाला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. भारतीय नौदलाच्या प्रवक्त्यांनी ट्विटरवरुन याबाबतची माहिती दिली आहे.
नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणेच सरावासाठी आज सकाळी 10.30 च्या सुमारास ‘मिग 29 के’ विमानाने उड्डान केले. त्यानंतर काही मिनिटातच हे विमान समुद्रात कोसळले. या विमानातील पायलट अपघातानंतर सुखरुप बाहेर पडला. या घटनेच्या चौकशीचे आदेश नौदलाने दिले आहेत.
‘मिग 29 के’ हे विमान ब्लॅक पँथर जथ्यामधील अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. तांत्रिक कारणांमुळे हे विमान कोसळल्याची शक्यता नौदलाच्या प्रवक्त्यांनी वक्त केली आहे.









