301 ग्रॅम सोन्याचे दागिने परत न केल्याप्रकरणी एफआयआर
प्रतिनिधी /बेळगाव
येथील एका सराफी व्यावसायिकाविरुद्ध बुधवारी खडेबाजार पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हिंदवाडी येथील आणखी एका सराफाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अरविंद मुतकेकर यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला असून पुढील तपास करण्यात येत आहे.
301 ग्रॅम सोन्याचे दागिने परत न केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत. याच सराफ व्यावसायिकाविरुद्ध 20 दिवसांपूर्वी सोने चोरीबरोबरच फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. उपलब्ध माहितीनुसार हिंदवाडी येथील एका सराफ व्यावसायिकाने अरविंद मुतकेकर यांना 301 ग्रॅम सोन्याचे दागिने तयार करून दिले होते.
अरविंद हे मुतकेकर ज्वेलर्सचे भागिदार आहेत. अनिल मुतकेकर यांच्या निधनानंतर दिलेले दागिने किंवा त्याचे पैसे परत न केल्याचे संबंधित सराफाने पोलिसांना सांगितले आहे.
दरम्यान गेल्या महिन्यात अरविंद यांच्यासह सहा जणांविरुद्ध 4 कोटी 3 लाख रुपयांचे सोने चोरून नेल्याची फिर्याद अनिल मुतकेकर यांची मुलगी संपदा अनिरुद्ध वैद्य (रा. ठाणे, मुंबई) यांनी दाखल केली होती. 20 दिवसांतील ही दुसरी फिर्याद असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.