प्रतिनिधी/ सातारा
शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी सराफाला लुटणाऱया दरोडेखोरांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडुन दरोडा टाकुन जबरदस्तीने घेऊन गेलेल्या ऐवजासह, अग्निशस्त्र, मोबाईल हॅन्डसेट, कोयता व गुन्हा करण्यासाठी वापरलेली वाहने असा एकुण 2 लाख 82 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करून दरोडय़ाचा गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलीस रेकॉर्डवरील आरोपी या गुह्याचा मुख्य सुत्रधार आहे.) केडी ऊर्फ अर्जुन कुंदन इंगळे (वय 19, रा. यशवंतनगर, सैदापुर, ता. सातारा मुळ रा. अंबवडे खुर्द, ता. सातारा), अर्जुन दौलत पवार (वय 19, रा. सैदापुर कॅनालजवळ, सैदापुर, ता. सातारा मुळ रा. नामदेववाडी झोपडपट्टी सातारा), रोहित शिवाजी जाधव (वय 19, रा. यशवंतनगर, सैदापुर, ता. सातारा), विकास बाळासाहेब गोसावी (वय 32, यशवंतनगर, सैदापुर, ता. सातारा मुळ रा. रविवारपेठ, गोसावीगल्ली, सांगली) व एक अल्पवयीन मुलाचा गुह्यात समावेश आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवार पेठ येथील सराफाला रविवार दि. 19 मार्च रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास इंडिका कार आडवी मारून चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील बॅग हिसकावून घेऊन पाच जण पळून गेले होते. सराफाने यांची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करताच पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बंधे व पथकाला हा गुन्हा सैदापूर परिसरातील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांने केल्याची गोपनिय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे केडी ऊर्फ अर्जुन कुंदन इंगळे, अर्जुन दौलत पवार, रोहित शिवाजी जाधव, विकास बाळासाहेब गोसावी व एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुह्याच्या अनुशंगाने चौकशी केली असता त्यांनी गुह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 2 लाख 82 हजार 750 रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. सराफाचे अपहरण करून त्याला पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याकडून खंडणी वसुल करण्याचा हेतू या संशयितांचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाघमारे करत आहेत.








