प्रतिनिधी/ बेळगाव
शहापूर खडेबाजार रोडचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. याकरिता ठिकठिकाणी खोदाई करण्यात आल्याने व्यापाऱयांसह वाहनधारकांना धोकादायक बनला आहे. अशातच या रस्त्यावरील डेनेज चेंबर उघडय़ावर ठेवण्यात आल्याने नागरिकांच्या समस्येत भर पडली आहे. ड्रेनेज चेंबरमध्ये पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
शहापूरचा रस्ता खोदण्यात आल्याने पावसाळय़ात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. संपूर्ण रस्ता खराब झाल्याने व्यापारी, रहिवाशांना गेल्या चार महिन्यांपासून अडचणींचा सामना करावा लागत आहे. गटारीऐवजी पाईप घालून ठिकठिकाणी चेंबर उघडे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडताना धोका निर्माण झाला आहे. आता दुरुस्तीसाठी उघडे करण्यात आलेले चेंबरवरील झाकण बंद करण्यात आले नसल्याने नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. सराफकट्टा परिसरात रस्त्यावर मध्यभागी असलेल्या चेंबरमधील कचरा काढण्यासाठी चेंबरवरील झाकण गुरुवारी काढण्यात आले होते. पण दुरुस्तीचे काम झालेच नाही. चेंबरवर झाकण घालून बंद करण्याऐवजी उघडे ठेवून मनपाचे कर्मचारी गायब झाले. त्यामुळे वाहनधारक आणि पादचाऱयांना उघडे चेंबर धोकादायक ठरत आहे. ये-जा करणाऱया नागरिकांच्या हे लक्षात येत नसल्याने उघडय़ा चेंबरमध्ये पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. लहान मुले व वृद्धांना याचा धोका अधिक आहे. त्यामुळे बेजबाबदार मनपा कर्मचाऱयांच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर कर्मचाऱयांवर कारवाई करावी व उघडे डेनेज चेंबर बंद करावे, अशी मागणी होत आहे.









