ऑनलाईन टीम / पुणे :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याचे आणि मोहिते घराण्याचे नातेसंबंध शेवटपर्यंत टिकून होते हे इतिहासात दिसून येते. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची प्रेरणा आणि त्यांचे कार्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचायला हवे. त्याकरिता मोहिते घराण्याचा संकलित केलेला इतिहास पुढे आला पाहिजे. हंबीरराव मोहिते यांचा आणि त्यांच्या कार्याचा इतिहास पुढे आला तर या इतिहासातून तरुणांना स्फूर्ती मिळेल, असे मत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
मोहिते परिवाराच्या वतीने शिवजयंती महोत्सवानिमित्त शिवाजीनगर येथील श्री रोकडोबा देवस्थान सभागृहात मदतीनिधी प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कै. विकास मोहिते यांचा मुलगा ज्ञानेश मोहिते यास मोहिते कुटुंबियांच्या वतीने 1 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करुन शैक्षणिक मदत देण्यात आली.
विक्रमसिंह मोहिते म्हणाले, स्वत:ला काही मिळेल याची अपेक्षा न बाळगता स्वराज्य निर्मितीसाठी हंबीरराव मोहिते यांचे मोठे योगदान आहे. मोहिते घराण्याचे कर्तुत्व हे फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राबाहेरही दिसून येते.
ॲड. सुभाष मोहिते म्हणाले, आडनावाचा इतिहास हा प्रत्येकाला असतो, परंतु आडनावाबरोबर कर्तृत्वाचा वारसा देखील पुढे चालवला पाहिजे. चांगले काम करण्यासाठी आपण एकत्र येत नाही ही खंत आहे. परंतु समाजात अनेक कर्तृत्ववान व्यक्ती आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी व त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आपण नक्कीच एकत्र आले पाहिजे.








