प्रतिनिधी / आजरा
शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही केवळ थकबाकीदार सभासदांसाठी असून नियमित कर्ज भरणाऱया सभासदांवर अन्याय करणारी आहे. यामुळे सरसकट कर्जमाफी करून नियमित कर्ज भरणाऱया सभासदांनाही न्याय द्यावा या मागणी आजरा तालुक्यातील विविध संस्थाचे पदाधिकारी, सभासद व विविध पक्षीय नेते मंडळींनी एकीची वज्रमूठ आवळत आजरा तहसीलदार कार्यालयावर विराट मोर्चा काढून मागणीचे निवेदन दिले.
येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ाजवळ आंदोलनकर्ते दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास झाले. याठिकाणी जिल्हा बँकेचे संचालक अशोक चराटी, जनता बँकेचे चेअरमन मुपुंदराव देसाई, माजी सभापती अल्बर्ट डिसोझा, मसणू सुतार, तालुका संघाचे माजी चेअरमन सुधीर देसाई, चेअरमन एम. के. देसाई यांनी कर्जमुक्ती योजनेची व्याप्ती वाढवून सरसकट 2 लाखांची कर्जमुक्ती देण्याची मागणी मनोगतातून केली.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा आदेश लक्षात घेता या योजनेचा लाभ केवळ थकबाकीदारांना मिळणार आहे. यामुळे नियमित कर्जदारही कर्ज भरण्यास तयार नाहीत. याचा फटका गावोगावच्या विकास सेवा संस्थांच्या कार्यक्षमतेवर होऊ लागला आहे. यावर्षी अतिवृष्टी, महापूर यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून कर्जमुक्ती योजनेचा लाभ न मिळाल्याने शेतकऱयांचे कंबरडे मोडले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
प्रत्येक वेळी कर्जमुक्ती होत नाही, पण वेळेत कर्जफेड करणाऱया सभासदांना शासनाकडून 3 टक्के व्याज परतावा मिळतो. हा लाभ मिळविण्यासाठी नियमित कर्ज भरणारे कर्जदार उसनवारी तसेच इतर बँकांची कर्जे घेऊन वेळेत कर्ज भागवितात. अशा कर्जदारांना या योजनेचा कोणताच लाभ मिळत नाही. यासाठी शासनाने सरसकट कर्जमुक्ती करून थकबाकीदारांबरोबरच नियमित कर्जदारांनाही या योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी सर्वच वक्त्यांनी केली.
येथील शिवाजी महाराजांच्या पुतळय़ापासून सुरू झालेला हा मोर्चा मुख्यबाजारपेठ, संभाजी चौकातून तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात आला. याठिकाणी तहसीलदार विकास अहिर यांच्याकडे मागणीचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात सभापती उदयराज पवार, आनंदराव कुंभार, सर्जेराव देसाई, जी. एम. पाटील, विलास नाईक, निवृत्ती कांबळे, विठ्ठलराव देसाई, दिगंबर देसाई, दशरथ अमृते, राजू पोतनीस, संभाजी सरदेसाई, रामचंद्र पाटील, गोविंद पाटील, रणजित देसाई, युवराज येसणे यांच्यासह तालुक्यातील सर्व सेवा संस्थांचे पदाधिकारी, सभासद व शेतकरी मोठय़ा संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.









