प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोना लसीकरणाच्या तिसऱया टप्प्याची तयारी सुरू करण्यात आली असून तिसऱया टप्प्यात 17 फेब्रुवारीपासून सरपंच आणि ग्रामसेवकाना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. त्यासाठी त्यांची कोविन ऍपवर नाव नोंदणी सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.
16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य अधिकारी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, तर दुसऱया टप्प्यात महसूल व पोलीस अधिकारी, कर्मचाऱयांना लस देण्यात आली आहे. 20 हजार लस उपलब्ध असून आवश्यकतेप्रमाणे ती उपलब्ध केली जात आहे.
कोरोना लसीकरणाच्या दोन टप्प्यानंतर तिसऱया टप्प्याला 17 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तिसऱया टप्प्यात ग्रामसेवक, सरपंच, ग्रामविस्तार अधिकारी यांना लस दिली जाणार आहे. त्यानंतर वयोवृद्ध लोक आणि नंतर सर्वसामान्य नागरिकांना लस दिली जाणार आहे.
आतापर्यंत एकालाही त्रास नाही!
लस देण्यात येणाऱया व्यक्तीचे कोविन ऍपवर रजिस्ट्रेशन केले जाते. त्यानंतर त्यांना तारीख देऊन लस दिली जाते. आतापर्यंत कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींपैकी एकालाही त्रास झालेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले.









