वाठार किरोली / वार्ताहर
कोरेगाव तालुक्यातील ५६ गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावपुढारी, स्थानिक पुढारी, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. मात्र सरपंचपदाचे आरक्षण ऐनवेळी राज्य सरकारने रद्द केल्याने पॅनल प्रमुखांची हवा गुल झाली असून भावी सरपंच कोण याची शाश्वती नसल्याने निवडणुकीच्या खर्चावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
पॅनलप्रमुखांची मोर्चे बांधणी वाया
सरपंचपदाची आरक्षणाची सोडत निवडणुकीपूर्वी होणार, असे जाहीर झाले होते. त्यावेळी सर्वजण बिनधास्त होते. आपणच सरपंच होणार या आविर्भावात अनेकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली. गावाचा कारभार आपल्या हातात येणार म्हणून काहींनी व्याजाने पैशांची जुळवाजुळव केली. आपल्या पॅनलमध्ये कोणते उमेदवार असावकोण सरपंच असावा, कोण उपसरपंच असावा याचीही निश्चिती अनेकांनी करून ठेवली होती. कोणत्या वार्डात कोण निवडून येणार, उमेदवारांची मते किती, किती मते बाहेर गेलेली, वॉर्डात किती मते आपली, किती मते विरोधकांना पडतील विरोधकांचा प्रभाव किती या सर्वगोष्टींचा अभ्यास पॅनलप्रमुखांनी मागच्या दोन महिन्यांपासून केला.
मात्र राज्य शासनाने सरपंचपदाची निवडणूक आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर करणार असल्याचे जाहीर केल्याने पॅनल प्रमुख थंडगार पडले आहेत. खर्चाच्या बाबतीत आखडता हात आता निवडणूक लढताना खर्च कोणी करायचा हा मोठा प्रश्न उमेदवाराला पडला आहे. आरक्षणामुळे पॅनल प्रमुख द्विधा मनःस्थितीत आहेत. त्यामुळे पॅनल करतानाही अनेकजण आता डळमळताना दिसत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बाशिंग बांधून तयार असणारे अनेक कार्यकर्ते हे सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाल्याने हिरमुसले असून पुन्हा तेच आरक्षण पडते की नव्याने दुसरे आरक्षण पडते या द्विधा मनःस्थितीत आहेत. त्यामुळे खर्चावर ते आखडता घेत असल्याचे ग्रामीण भागात चित्र आहे.
गावात गप्पा रंगू लागल्या.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर उधाण आले आहे. गाव विकासावर गंध नसणारे ही सध्या गाव विकासाच्या गप्पा मारताना दिसू लागल्याने अनेक युवक सोशल मीडियावर टीका टिप्पणी करीत आहेत, अशा लोकांना जनता किती थारा देईल हे निवडणुकीच्या निकाला नंतरच कळणार आहे.








