जिल्हय़ातील 431 ग्रा. पं. च्या सरपंचपदाची होती आरक्षण सोडत : 15 जानेवारीनंतर आरक्षण सोडतीची तारीख होणार जाहीर
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील 2020-25 या कालावधीसाठी जिल्हय़ातील एकूण 431 ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदाचे आरक्षण सोडत 16 डिसेंबरला एकाच दिवशी काढण्यात येणार होती. मात्र, ही आरक्षण सोडत स्थगित करण्यात आली असून नुकत्याच जाहीर झालेल्या 70 ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदानानंतर म्हणजेच 15 जानेवारी 2021 नंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्हय़ात एकूण 431 ग्रामपंचायती असून त्यातील 70 ग्रा. पं. ची पाच वर्षांची मुदत ऑगस्ट 2020 मध्ये संपली आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ग्रामपंचायतीच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. सद्यस्थितीत या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यामुळे या 70 ग्रा. पं. सह जिल्हय़ातील सर्व 431 ग्रा. पं. च्या पुढील 2020 ते 2025 या कालावधीसाठी सरपंचपदाची आरक्षण सोडत 16 डिसेंबरला एकाच दिवशी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांच्या उपस्थितीत होणार होती. यामध्ये जिल्हय़ातील 431 ग्रा. पं. मध्ये सावंतवाडी तालुक्यातील- 63, दोडामार्ग तालुक्यातील- 36, कुडाळ – 68, वेंगुर्ले – 30, मालवण – 65, कणकवली – 63, देवगड – 72, वैभववाडी – 34 ग्रा. पं. या प्रमाणे तालुकानिहाय सरपंचपदाचे आरक्षण काढले जाणार होते.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱया व नव्याने स्थापित होणाऱया ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होऊन 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याने 16 डिसेंबरला होणारी जिल्हय़ातील सर्व 431
ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत स्थगित करण्यात आली आहे. ग्रा. पं. निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान झाल्यानंतर सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीची तारीख जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.








