आता ग्रा. पं. निवडणुकीनंतरच होणार सोडत
वार्ताहर / सावंतवाडी:
जिल्हय़ातील सरपंचपदाची आरक्षण सोडत 16 डिसेंबरला होणार होती. मात्र, जिल्हय़ातील 70 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे 16 डिसेंबरची सरपंचपदाची आरक्षण सोडत रद्द करून ती पुढे घेण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. त्यामुळे आता या 70 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत होणार आहे.
राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सरपंच आरक्षण सोडत रद्द करून 70 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर सरपंच आरक्षण सोडत घ्यावी, असे कळविण्यात आले आहे. सिंधुदुर्गात 70 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या ग्रामपंचायतींवर सरपंच आरक्षण पडलेले नाही. त्यामुळे सरपंच आरक्षण काय असणार, याची उत्सुकता होती. तसेच सरपंच आरक्षण सोडतीवर निवडणुकीचा फॉर्म्युला ठरणार होता. आता सरपंच आरक्षण सोडतच पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या निर्णयानुसार थेट सरपंच निवड रद्द झाली आहे. सदस्यांतूनच सरपंच निवड होणार आहे. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे.








