उचगांव / वार्ताहर
बंगल्यामध्ये कोणीही नसल्याचा लाभ उठवत अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून दोन तोळे सोन्याचे दागिने, घरगुती साहित्य व रोख 15 हजार असा 70 हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही चोरी विनायक बबन खेडकर यांच्या सरनोबतवाडी ता करवीर येथील भक्तीप्रेम बंगल्यामध्ये झाली.
खेडकर कुटुंब रांजणगाव ( पुणे) येथे नातेवाईकाच्या वाढदिवसानिमित्त दोन-तीन दिवस बाहेर गेले होते. त्याचा फायदा उठवत चोरट्यांनी खेडकर यांच्या बंगल्याचे कुलूप तोडले व आत प्रवेश केला. बंगल्यातील पंधरा हजार रुपये किंमतीचे आठ ग्रॅमचे सोन्याचे टॉप, सहा ग्रॅम वजनाची 15 हजार रुपयांची सोन्याची चेन व आणखी एक पाच ग्रॅमची दहा हजारांची चेन व इतर घरगुती साहित्य याशिवाय पंधरा हजार रुक्मिणी सह 70 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
शेजाऱ्यांनी याबाबत खेडकर यांना फोनवरून कळवले. त्यानंतर खेडकर यांनी बंगल्यात येऊन पाहिले असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याबाबतची फिर्याद विनायक खेडकर यांनी गांधीनगर पोलिसात काल रात्री उशिरा दिली. अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला असून हेडकॉन्स्टेबल बजरंग हेब्बाळकर अधिक तपास करत आहेत.