प्रतिनिधी/ बेळगाव
‘भले बुरे जे घडून गेले,
विसरून जाऊ सारे क्षणभर,
जरा विसावू या वळणावर, या वळणावर…
असे म्हणत कटू आठवणींना मागे टाकत चैतन्यमय वातावरणात नव्या वर्षाचे स्वागत जय्यत करण्यात आले. रात्रभर सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाची धूम पहायला मिळाली. संगीताच्या तालावर मित्र-मैत्रिणींच्या व स्नेहीजणांच्या साक्षीने परस्परांना शुभेच्छा देत व फटाक्यांची आतषबाजी करत नववर्षाचा जल्लोष साजरा करण्यात आला.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शनिवार आल्याने नागरिकांमधील उत्साह अधिक होता. विकेंड असल्यामुळे आपल्या कुटुंबासमवेत नववर्षाचा जल्लोष साजरा करता आला. लहान मुले व युवकांनी मागील 8 ते 10 दिवसांच्या प्रयत्नानंतर तयार केलेल्या ओल्डमॅनचे मध्यरात्रीनंतर दहन करण्यात आले. अनेकांनी केक कापून नव्या वर्षाचे सेलिब्रेशन केले. त्यामुळे विविध फ्लेवर्समधील केकलाही मागणी होती.
हॉटेल्समध्ये डिजे नाईट्सचे आयोजन
कोरोनामुळे मागील दोन वर्षांत नववर्षाचा उत्साह नव्हता. त्यामुळे यावर्षी मोठ्या उत्साहात ईयर एंडिंग साजरा करण्यासाठी हॉटेल्समध्ये डिजे नाईट व फुड फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले होते. संगीताच्या तालावर खवय्यांनी चमचमीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. शहराबरोबरच उपनगरांमधील हॉटेल्समध्ये मध्यरात्रीपर्यंत नववर्षाचा आनंद घेण्यात आला. काही हॉटेल्सनी फॅमिली पॅकेजचे आयोजन केले होते. त्यामुळे कुटुंबासमवेत आनंद घेणे सोयीचे ठरले.
थर्टीफस्ट साजरा करणाऱ्या तळीरामांवर पोलिसांची करडी नजर होती. शहराच्या महत्त्वाच्या मार्गांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह करणाऱ्यांची तपासणी करून दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शिवारात रंगल्या पार्ट्या
अनेकांनी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पार्ट्यांचे आयोजन केले होते. शिवारांमध्ये पार्ट्यांचा उत्साह सर्वाधिक होता. शहरालगत असणाऱ्या शिवारात सध्या भातकापणी झाली असल्याने शेत खुले होते. त्यामुळे रात्रभर मौजमजा, नाचगाणी सुरू होती. ईयर एंडिंगला विकेंड जोडून आल्याने गर्दी झाली होती. जुने बेळगाव, वडगाव, मजगाव, पिरनवाडी, खादरवाडी, मच्छे, कंग्राळी या शिवारांमध्ये पार्ट्यांची धूम सूरू होती.
ऑर्चिड रिसॉर्टच्या न्यू ईअर पार्टीला तुफान प्रतिसाद
नावगे क्रॉस, बेळगाव-चोर्ला रोड येथील द ऑर्चिड रिसॉर्टतर्फे आयोजित केलेल्या ‘अंडर द स्काय’ या न्यू ईयर पार्टीला नागरिकांनी तुफान प्रतिसाद दिला. शहरापासून दूर शांत व रम्य वातावरणात सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. लाईव्ह म्युझिक व रॉक बॅण्डच्या तालावर उपस्थितांना थिरकणे आवरले नाही. शाकाहारीसह मांसाहारी खाद्यपदार्थांवर सुरेख संगम या ठिकाणी असल्याने नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.









