कोल्हापूर येथील युवकाला अटक, सीआयडी वनविभागाची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
सरडय़ांच्या अवयवांची तस्करी करणाऱया कोल्हापूर येथील एका युवकाला शुक्रवारी अटक करण्यात आली. सीआयडी पोलीस वनविभागाच्या उपनिरीक्षक रोहिणी पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी निपाणीजवळ ही कारवाई केली असून त्यांच्याजवळून 25 अवयव जप्त करण्यात आले.
एका प्लास्टिकच्या पिशवीतून सुमारे 10 हजार रुपये किमतीचे सरडय़ांचे 25 अवयव घेऊन एमएच 09 ईक्मयु 1020 क्रमांकाच्या दुचाकीवरून हा युवक कोल्हापूरहून निपाणीकडे येत असल्याची माहिती मिळताच पोलीस वनविभागाच्या पथकाने त्याला अटक केली. त्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.
पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील, एस. आर. अरीबेंची, के. डी. हिरेमठ, एम. ए. नाईक व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली. त्याला निपाणी येथील जेएमएफसी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.
उपलब्ध माहितीनुसार हातजोडी या वनस्पतीला मोठी मागणी आहे. हातजोडी ज्यांच्या घरी आहे त्यांची भरभराट होते, या समजुतीने अनेक जण ती मिळविण्यासाठी उत्सुक असतात. मात्र, हातजोडीसारखेच दिसणाऱया सरडय़ाच्या अवयवांची विक्री करण्यासाठी घेऊन येत असताना कोल्हापूरच्या युवकाला अटक करण्यात आली.









