करझाई यांनी घेतली तालिबान नेत्यांची भेट, मात्र विरोधाचेही सूर, दोघांच्या हत्या
काबूल / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानची राजधानी काबूलचा ताबा घेतल्यानंतर तालिबानने त्वरेने सरकार स्थापनेसाठी हालचाल सुरु केली आहे. तथापि, तालिबानविरोधात काही नेते पुढे आले असून त्यांनी समांतर व्यवस्था स्थापन करण्याची तयारी चालविली आहे. दरम्यान, जलालाबाद शहरात तालिबानविरोधात अफगाणिस्ताचा ध्वज फडकविणाऱया दोघांना गोळय़ा घालून ठार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या देशाचे माजी अध्यक्ष हमीद करझाई यांनी तालिबान नेत्यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा केली. तालिबानच्या अनेक नेत्यांपैकी अनास हक्कानी यांनी करझाई यांच्याशी बोलणी केली. मंगळवारी तालिबानने आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा केली होती. तालिबान सूडभावनेने राज्य करणार नाही. शरियत कायद्यानुसार महिलांना जे अधिकार आहेत ते दिले जातील. सर्व देशांच्या दूतावासांची सुरक्षा करण्यात येईल. जगाने आमच्यावर विश्वास ठेवावा, अशी अनेक वक्तव्ये करण्यात आली होती.
भारतीय अधिकाऱयांना संरक्षण
मंगळवारी भारतीय दुतावासातील अधिकारी व कर्मचारी भारतात परतले. त्यांना तालिबानच्या सदस्यांनी दुतावास ते विमानतळ यग्ना प्रवासात संरक्षण दिले होते. भारतासंदर्भात या सदस्यांनी व त्यांच्या नेत्यांनी प्रशंसोद्गार काढले, असा अनुभव कर्मचाऱयांनी भारतात आल्यानंतर कथन केला. तालिबानमधील हे परिवर्तन सातत्यपूर्ण राहिल्यास ती सकारात्मक बाब असेल असे मत व्यक्त होत आहे.
काही दुकाने उघडली
गेले तीन दिवस काबूलमधील सर्व दुकाने बंद होती. मात्र, बुधवारी काही दुकाने उघडल्याचे दिसून आले. सध्या काबूलमध्ये शांतता असून लोकांचे नित्य व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरु होत आहेत. मात्र, अद्यापही वातावरण तणावग्रस्त असून नवे शासन कशाप्रकारे कार्य करते याकडे साऱयांचे लक्ष लागून राहिले आहे.
पाक दहशतवाद्यांकडून लूट
अफगाणिस्तानातील तालिबान शांततेची भाषा करीत असताना पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा आणि जैश्öए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांचे हस्तक पाकिस्तानात आश्रयास आलेल्या अफगाण नागरिकांची लूट करीत आहेत. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. तसेच हे दहशतवादी अफगाण-पाक सीमेवरील अफगाण खेडय़ांमध्ये धुमाकूळ घालत असून बंदुकीचा धाक दाखवून खंडणी गोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानने आता सरकार स्थापनेतही ढवळाढवळ सुरु केली असून सरकारमध्ये पाकिस्तान समर्थक सिराजुद्दिन हक्कानी यांना महत्वाचे स्थान दिले जावे, यासाठी दबावतंत्र अवलंबिण्यात येत आहे.
पाकचे शांतताविरोधी डावपेच
काबूलचा ताबा शांततेने घेण्याची तालिबानची इच्छा होती. शांतता बोलणी संपेपर्यंत काबूलच्या सीमेवर प्रतीक्षा केली जाणार होती. तथापि, काबूलचा ताबा शांततापूर्ण पद्धतीने घेण्यास पाकिस्तानने विरोध केला. पाकच्या गुप्तचरांनी तालिबानला काबूलवर हल्ला करण्याचा आदेश दिला होता, असेही वृत्त आहे. त्यामुळे तालिबानने त्वरित काबूलमध्ये घुसून ताबा घेतला. शांततापूर्ण पद्धतीने राज्य करण्याचे आश्वासन तालिबानला पूर्ण करायचे असेल तर त्याला पाकिस्तानपासून दूर तसेच सावध रहावे लागेल, असा इशारा अनेक तज्ञांनी दिला आहे.









