प्रतिनिधी/ पणजी
बावीसपेक्षा अधिक जागा जिंकून राज्यात भाजपाच सत्तेवर येईल. त्यामुळे पूर्ण बहुमताचे सरकार घडत असल्याने सुदिन ढवळीकर यांची आम्हाला गरजच लागणार नाही, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांनी व्यक्त केला आहे.
गोव्यात आम्ही बहुमताने सत्तेवर येत असल्याने ढवळीकर यांची गरज लागणार नाही, असे ‘तरुण भारत’शी बोलताना ते म्हणाले. करवीर निवासिनी अंबाबाई देवीवर माझी पूर्ण श्रद्धा आहे आणि देवीचा आशीर्वाद नेहमीच आपल्या पाठीशी राहिला आहे. तिच्याच आशीर्वादाने चारवेळा आमदार आणि आता राज्याचा उपमुख्यमंत्री बनलो आहे. तिच्या आशीर्वादानेच पुन्हा निवडून येणार आहे, असा विश्वास आजगावकर यांनी व्यक्त केला.
यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांनी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारात आम्ही कदापि सहभागी होणार नाही, असे म्हटले होते. त्यावर बोलताना आजगावकर यांनी, गोव्यात भाजपचे 22 पेक्षा जास्त उमेदवार विजयी होणार असून आम्ही बहुमतात असणार आहे. त्यामुळे ढवळीकर यांची आम्हाला गरज भासणार नाही, असे प्रत्युत्तर आजगावकर यांनी दिले.
राजकारणात आरोप-प्रत्यारोप हे नाविन्य नाही
दरम्यान, भाजपने गोव्यात देखील फोन टॅपिंगचे प्रकार केले असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यासंबंधी विचारले असता आजगावकर यांनी, निवडणूक म्हटले की राजकारण आणि आरोप-प्रत्यारोप होणारच, ज्यांच्यात खोट नाही त्यांना घाबरण्याची गरज नाही. आम्ही कुणावर सूड उगवणे, हल्ले करणे यासारखे विचारसुद्धा मनात आणत नाही, अशा शब्दांत आजगावकर यांनी सडेतोड उत्तर दिले.









