भाजप, काँग्रेसकडून ढवळीकरांना निमंत्रणे : मात्र मगोसमोर विश्वास ठेवण्यावरुन प्रश्न
- नव्या प्रतिनिधींच्या स्वागतास विधानसभा सचिवालयाची तयारी
- 14 मार्च रोजी अधिवेशन शक्य, नवे सरकार ठरविणार कामकाज
प्रतिनिधी /पणजी
नव्याने निवडून येणाऱया गोवा विधानसभेच्या नव्या अधिवेशनासाठी विधानसभा सचिवालयाने काम सुरु केले आहे. साधारणतः 14 मार्च रोजी पहिले अधिवेशन होईल असा अंदाज आहे. विद्यमान गोवा विधानसभेची मुदत दि. 16 मार्च रोजी संपुष्टात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, दि. 10 मार्च रोजी निवडणूक निकाल झाल्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेला त्वरित मुहूर्त मिळणार, भाजपचा पराभव झाला तरी देखील भाजपने सत्ता स्थापनेची जोरदार तयारी सुरु ठेवली आहे. विरोधी पक्षांच्या उमेदवारांशी भाजपने आपला संपर्क ठेवला आहे. भाजपला स्वबळावर पुन्हा विजयी होईल असे वाटत नाही. गोव्याचा एकंदर निवडणूक निकालाचा अंदाज घेता कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. मात्र काँग्रेस पक्ष हा सर्वाधिक संख्येचा पक्ष ठरणार असा अंदाज वर्तविला जात आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने सर्व विरोधी पक्षांची एकत्रित मोट बांधण्याचा जोरदार प्रयत्न चालविला आहे. काँग्रेसने तृणमूल, मगो, अपक्ष तसेच आपच्या उमेदवारांशी देखील संपर्क साधलेला आहे.
मगो महत्त्वाची भूमिका बजवणार?
या निवडणुकीत मगो पक्षाने खूपच चांगली कामगिरी बजावल्याने त्यांचे यावेळी 4 ते 5 उमेदवार निवडून येतील असा अंदाज आहे. सरकार स्थापनेत मगो महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. काँग्रेसचा आकडा 14 ते 15 पर्यंत सिमीत झाला तर मगो नेते सुदिन ढवळीकर यांना काँग्रेस पक्ष मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊ शकतो. काँग्रेसच्या एका नेत्याने वरील माहिती दिली मात्र काँग्रेसचा आकडा जास्त वाढला तर मात्र मुख्यमंत्रीपद हे काँग्रेसकडेच राहील. काँग्रेसने मगो नेते सुदिन ढवळीकर व पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्याशीदेखील संपर्क साधलेला आहे आणि सरकारमध्ये सामील व्हा. एकत्रित मजबूत सरकार स्थापन करुया, असे म्हटले आहे.
विश्वास कोणावर ठेवावा? मगोसमोर प्रश्न
भाजप कोणत्याही परिस्थितीत सुदिन ढवळीकर यांना मुख्यमंत्रीपद देणार नाही. भाजपला सरकार स्थापनेसाठी संख्याबळ कमी पडले व मगोने ते पूर्ण केले तरी देखील सरकार सत्तेवर आल्यानंतर सुदिन ढवळीकर यांना सरकारमधून बाहेर फेकून मगोच्या इतर आमदारांना थेट भाजपमध्ये प्रवेश देऊन मागे झाले त्याचीच पुनरावृत्ती भाजपवाले करु शकतात. त्यामुळे भाजपवर विश्वास कसा ठेवायचा? हा सुदिन ढवळीकर यांच्यासोर प्रश्न उपस्थित झालेला आहे.
या संपूर्ण गडबडीत ज्यांच्याबरोबर मगो पक्ष जाईल त्याचे सरकार स्थापन होईल. मग त्या सरकारमध्ये मगो पक्ष सभापतीपदावर हक्क पेश करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
14 मार्च रोजी अधिवेशन?
गोवा विधानसभेची मुदत 16 मार्च रोजी संपुष्टात येत आहे. एकतर त्या दिवशी वा अगोदर अधिवेशन घेणे आवश्यक असल्याने गोवा विधानसभेचे अधिवेशन हे दि. 14 मार्च रोजी होईल असा प्राथमिक अंदाज आहे. या अधिवेशनात सर्व नव्याने निवडून आलेल्या लोक प्रतिनिधींना शपथ देण्यात येऊन ते आमदार बनतील. याचदिवशी शपथ ग्रहणानंतर विधानसभेत विश्वासदर्शक ठराव संमत करावा लागेल किंवा गरज पडल्यास सभापतीपदाची निवडणूकही घेतली जाऊ शकते. जे सरकार सत्तेवर येईल ते आपल्या सोयीनुसार अधिवेशनाचा कार्यक्रम ठरविणार आहेत.
अर्थसंकल्प 31 मार्चपर्यंत आवश्यक
नव्या सरकारला संबोधित करण्याचे काम राज्यपालांनी करायचे असते. राज्यपालांचे अभिभाषण हे विधानसभा अधिवेशनाच्या द्वितीय टप्प्यात करता येते. त्याचबरोबर अर्थसंकल्प सादर करण्यास 31 मार्चपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे दि. 28 ते 30 मार्च या दरम्यान, विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल. याच अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण दुसऱयादिवशी अर्थसंकल्प व 4 महिन्यांसाठी लेखानुदान मागण्या घेता येऊ शकतात.
आजपासून अधिवेशनाची तयारी : नम्रता उलमन

विधानसभा सचिव श्रीमती नम्रता उलमन यांच्याशी संपर्क साधला असता विधानसभा अधिवेशनासाठी आवश्यक ती तयारी आम्ही आजपासून करणार आहोत. सभागृहाची साफसफाई तसेच ध्वनीक्षेपक व इतर तांत्रिक यंत्रणेची देखभाल व सारी यंत्रणा पुढील दोन दिवसांत सज्ज करुन नव्या लोकप्रतिनिधींच्या स्वागताची तयारी आम्ही करणार आहोत. दि. 16 मार्चच्या अगोदर विधानसभेचे अधिवेशन बोलाविणे ही गरज आहे. अन्यथा घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो. त्यासाठीच 16 मार्चच्या अगोदर सभागृहाची बैठक नवे सरकार व राज्यपाल बोलावितील, असे त्या म्हणाल्या.









