माजी आमदार रामराव वडकुते यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी / सोलापूर
ओबीसीचे राजकीय आरक्षण पुन्हा द्या, ओबीसींची जातिनिहाय जनगणना करा यासह विविध मागण्यासाठी राज्य व केंद्र सरकार विरोधात 31 ऑगस्ट रोजी सोलापुरात ओबीसींचा मोठा मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार रामराव वडकुते यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत सोमवारी माहिती दिली. ओबीसी आरक्षण मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हा व राज्य समन्वयक यांची सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. त्यानंतर माजी आमदार वडकुते यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
केंद्र सरकारच्या हलगर्जीपणामुळे ओबीसी समाजाचे 27% राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी या तत्त्वाप्रमाणे राज्यात 54 टक्के ओबीसी समाज असतानाही आरक्षण मिळत नाही. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारविरोधात 31 ऑगस्ट रोजी सोलापुरात ओबीसींचा भव्य मेळावा घेण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालय इम्पीरियल डाटा नसल्याने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द ठरवले त्या ठिकाणी केंद्र व राज्य सरकारने ओबीसी समाजाची बाजू व्यवस्थितपणे मांडली नाही. त्यामुळे आरक्षणापासून ओबीसी समाजाला वंचित राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात हा मेळावा होईल असेही माजी आमदार वडकुते यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस राज्य समन्वयक अमोल खरमाटे, सुशीला मोराळे, माजी महापौर अलका राठोड, नलिनी चंदेले ,शरद कोळी, शेखर बंगाळे आदी उपस्थित होते.









