अमरनाथ पणजीकर यांची माहिती, सरकारच्या कामगिरीवर टीका
प्रतिनिधी / पणजी
आपल्या नेतृत्वाखालील सरकारच्या नाकर्तेपणाचे खापर केवळ सरकारी अधिकारी व कर्मचाऱयांवर फोडण्याचा प्रयत्न करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील भाजप सरकार डिफेक्टीव्ह, भ्रष्ट व असंवेदनशील असल्याच्या काँग्रेस पक्षाच्या दाव्याला कबुलीच दिली आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.
दक्षता जागृती सप्ताहाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यानी राज्यात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराबद्दल एक शब्द काढू नये हे धक्कादायक आहे. लोकायुक्तांनी भाजप सरकारच्या कारकिर्दीतील मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांचा सहभाग असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांची दक्षता खाते तसेच सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, त्याबद्दल बोलण्याचे धाडस मुख्यमंत्र्याना झाले नाही, अशी बोचरी टीका अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.
भाजप सरकारला उतरती कळा लागल्याचे आता सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना कळले आहे. त्यामुळेच सरकारच्या ‘मिशन कमिशन’ मध्ये सहभागी होऊन भाजपच्या ‘फोर्चन मेकींग’ कार्यक्रमात सहभागी होण्यास ज्या अधिकाऱयांनी नकार दिला त्यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न वैफल्यग्रस्त झालेल्या मुख्यमंत्र्यानी केल्याचे पणजीकर म्हणाले.
सावंत सरकार चिरीमिरीही करते गोळा
आपल्या सर्व खात्यातील शिपाई व कारकुनांशी कनेक्शन असल्याचे मुख्यमंत्र्यानी काल उघडपणे कबुल केले आहे. त्यामुळे डिचोली पोलीस खात्याशी सलग्न असलेल्या व आपल्या राजकीय गॉडफादरच्या नावे हप्ते गोळा करीत असलेला मालक कोण याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा. कोलवा येथे एका हॉटेलवर पडलेल्या धाडीत जुगार खेळणाऱयांकडून 6 लाख जप्त केले होते, त्याची वाटणी कशी झाली यावरही मुख्यमंत्र्यानी भाष्य करावे, अशी मागणी करुन सावंत सरकार आता चिरीमिरी गोळा करीत असल्याचा टोला पणजीकर यांनी हाणला.
सत्तेत आल्यावर भ्रष्टाचाराची चौकशी करणार
काँग्रेस पक्ष 2022 मध्ये सत्तेत आल्यानंतर सर्व भ्रष्टाचारी प्रकरणांची उच्चस्थरीय चौकशी करणार आहे. तसेच राज्यातून भ्रष्टाचाराचा संपूर्ण नायनाट करण्याचे काँग्रेसचे धोरण असल्याचे सांगून भ्रष्टाचार मुक्त गोवा हा काँग्रेसचा वचननामा असेल असे अमरनाथ पणजीकर यांनी सांगीतले.
दक्षता सप्ताह कार्यक्रमात दक्षता खात्याच्या कामगिरीबद्दल जाणीवपूर्वक बोलण्याचे टाळून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. लोकांची दिशाभूल करण्यासाठी तसेच आपल्या सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठीच मुख्यमंत्र्यानी असे केले, अशी टीका पणजीकर यांनी केली.
घोटाळय़ांची चौकशी होणे आवश्यक
भाजपचे मंत्री, आमदार व पदाधिकारी यांचा सहभाग असलेल्या 21 भ्रष्टाचार प्रकरणांच्या चौकशीचे आदेश लोकायुक्तांनी दिले त्याचे काय झाले हे लोकांना जाणून घ्यायचे आहे. किनारा स्वच्छता घोटाळा, सायबर एज घोटाळा, बांधकाम कामगार निधी घोटाळा, नगर नियोजन खाते घोटाळा, इफ्फी घोटाळा, स्पेसीस इमारत भाडे घोटाळा, लाईफ गार्ड कंत्राट घोटाळा, पे पार्कींग स्कीम अशा अनेक प्रकरणांची चौकशी होणे गरजेचे आहे. परंतु मुख्यमंत्री त्यावर एक शब्द बोलत नाहीत, असे त्यांनी सांगितले.
भाजप सरकारला जनताच धडा शिकवणार मुख्यमंत्र्यानी सरकारतील उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हे गांधी जयंती दिनी एका पंचतारांकीत हॉटेल बाहेर ‘हाय स्पिरीट’मध्ये कसे होते तसेच त्यांच्या मोबाईल मधून एक अश्लिल व्हिडीओ कसा प्रसारीत केला यावर भाष्य करणे गरजेचे आहे. याचबरोबर आज इतरांना दोष देणाऱया मुख्यमंत्र्यानी त्यांच्या डिफेक्टिव, भ्रष्ट व असंवेदनशील कारभाराला इतरांना जबाबदार धरू नये. लोकांप्रति असंवेदनशीलता दाखवणाऱया भाजप सरकारला आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच 2022 च्या विधानसभा निवडणुकीत जनता योग्य धडा शिकवणार, असा इशारा अमरनाथ पणजीकर यांनी दिला आहे.









