मुंबई / ऑनलाईन टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात नुकत्याच दिल्लीत झालेल्या बैठकीवर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले आहे. सरकार बनवण्याच्या हालचाली या कोणी ट्विट करून सांगत नाही. त्यामुळे ही भेट नक्कीच सरकार बनवण्यासाठी नव्हती असा खुलासा मुनगंटीवार यांनी केला आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या भेटीत नेमके काय झाले हे सांगता येणार नाही. महाभारतातल्या संजयचा अधिकार आपल्याला नाही आणि ते कौशल्यही नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, लोकसभा अधिवेशनाच्या अगोदर काही विषयांच्या संदर्भात कदाचित महाराष्ट्राच्या ज्या काही उणिवा किंवा त्रुटी आहेत आणि राज्य सरकार ज्या पद्धतीने कारभार करते, त्या उणिवा आणि त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने माननीय पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष घालावे यासाठीची ही बैठक असू शकते.
सहकार खाते स्वतंत्र केल्यावर नव्या गोष्टी घडवाव्यात आणि जुन्या गोष्टी विसराव्यात हीदेखील भावना असू शकते. या संदर्भात एक तास चर्चा झाली असावी. पण यातून नवीन सरकार, नवीन आघाडी जन्माला येईल असे दूरपर्यंत वाटत नाही. सरकार बनवण्याच्या हालचाली, ज्या बैठका होतात त्या ट्विट करून कोणी सांगत नाही. सरकार बनवण्यासाठी ही भेट नक्कीच नाही. त्यामुळे सरकार जेव्हा बनायचे तेव्हा बनेल, असे देखील मुनगंटीवार म्हणाले.








