केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांची माहिती
वृत्तसंस्था/ जम्मू
खोट्या, बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारकडून नियमांमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत. नियम लागू होण्यापूर्वी यावर चर्चा केली जाईल, असे कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. आम्ही निवडणूक प्रक्रियेतही सुधारणा करण्याचा विचार करत असून फेक न्यूजशी संबंधित बातम्यांवर लगाम घट्ट करण्याचा विचार करणे आवश्यक असल्याचेही ते पुढे म्हणाले.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने नुकतीच यासंबंधी अधिसूचना जारी केली. त्यानुसार माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल मीडिया 2023 च्या नियमांमध्ये बदल होणार असल्याचे सांगण्यात आले. याअंतर्गत, एक पॅक्ट चेक युनिट (तथ्य तपासणी केंद्र) तयार केले जाणार आहे. हे केंद्र सरकारशी संबंधित खोट्या, बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांची चौकशी करणार असल्यामुळे ऑनलाईन खोट्या बातम्या पसरविण्याला आळा बसेल, असे रिजिजू म्हणाले.
केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू सध्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. याचदरम्यान त्यांना जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीबाबत विचारले असता यासंबंधी निवडणूक आयोग योग्यवेळी निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









