आमदार सुदिन ढवळीकर यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
वार्ताहर / मडकई
देशात कोविडची दुसरी लाट आली असून तिचा प्रसार प्रंचड प्रमाणात वाढलेला आहे. गोवा राज्यही याला अपवाद नाही. गोव्यात कोवीडचे रूग्ण वाढत आहे. मात्र गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे यासंदर्भात ‘नरो वा कुंजरो’ अशी भुमिका घेत आहेत. कोविडचा विषय गांभीर्यांने हाताळीत नसून व त्यासाठी आवश्यक असलेली मार्गदर्शक त्तत्वे तयार करीत नसल्याबद्दल मगो नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी सरकारवर टिकेची झोड उठवलेली आहे. बांदोडा येथील त्यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेतून त्यांनी सरकारच्या चाललेल्या मनमानी कारभारावर बोट ठेवले.
गोवा राज्याला जवळ असलेल्या महाराष्ट्र, केरळ व कर्नाटक राज्याचा कोवीडचा आलेख पाहिल्यास गोव्याला किती धोका आहे, हे लक्षात येईल. 144 कलम लावले असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. मात्र या कलमाची अमंलबजावणी होताना दिसत नाही. सर्रास रेव्ह पाटर्य़ा, समुद्रावर पर्यटकांचा ओघ, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना गर्दी, विमानतळ व रेल्वे प्लॅटफोर्म ही सर्व सार्वजनिक ठिकाणे गजबजलेली असतात. कुणीही मास्क लावलेले दृष्टोपत्त्तीस येत नाही. जनता याविषयी भिती बाळगून आहे. मात्र सरकार कोणतीच खबरदारी घेत नसून मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्या नकारात्मक धोरणामूळे गोव्यात कोवीड परत एकदा मोठय़ा प्रमाणात फैलावू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही असे घडल्यास याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असे आमदार सुदिन ढवळीकर यांनी या पत्रकार परिषदेतून सांगितले. कॅसीनोत कोवीडचा रूग्ण सापडताच अनेक प्रतिक्रीया उमटल्या प्रत्यक्षात सरकारची कृती मात्र शुन्य ठरलेली आहे.
सरकार कोवीड गांभीर्याने घेत नाही. हे परत परत ठासून सांगावे लागत आहे. आणि दुसऱया कुणाला मानतेच्या धर्मातून काम ही करू देत नाही. लोकशीहीत कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला जनसेवा करण्याचा अधिकार दिलेला आहे. याची सरकारला भूल पडलेली आहे. याचा अनुभव दोन दिवसापूर्वी मगो पक्षाचे कार्यकर्ते डॉ. केतन भाटीकर यांना आलेला आहे. गेले वर्षभर डॉ. भाटीकर कोवीडसाठी काम करीत आहे. यावेळेला ते बेतोडा प्रभू नगर येथील सॅनीटायझेशन करण्यासाठी गेले असता. उपजिल्हाधिकाऱयांकडून त्यांना अडवण्यात आले. कोवीड फैलावू नये म्हणून खबरदारी घेतल्यास गुन्हा ठरतो का असा सवाल करून कुठल्या मार्गदर्शक त्तत्वामध्ये हा गुन्हा मोडतो, हे आधी सरकारने स्पष्ट करावे असे आव्हान मगो नेते आमदार श्री. ढवळीकर यांनी सरकारला दिलेले आहे. पर्यटकांसाठी कोवीडचे निगेटीव्ह प्रमाणपत्र सक्तीचे करावे अशी मागणी करून, गुजरातमध्ये रात्रौ 7.00 नंतर सर्व कार्यक्रम बंद असतात. त्याच धर्तिवर सरकारने गोव्यातही रात्रौ 8.00 नंतरच्या कार्यक्रमावर खबरदारी म्हणून बंदी आणावी. तसेच 45 वर्षावरील नागरिकांनी कॉवेक्सीन मारून घेण्याचे आवाहन मगो नेते श्री. ढवळीकर यांनी या परिषदेतून जनतेला केले आहे.
सरकारचे दिखावूपणाचे अंदाजपत्रक
सरकार विधानसभेत मांडत असलेल्या अंदाजपत्रकाची अमंलबजावणी व्यवस्थीत होत नसून ते फक्त दिखावूपणासाठीच सादर केले जात असल्याची टीका आमदार श्री. ढवळीकर यांनी केली आहे. रूपया येतो कसा व जातो कसा हे गेली अनेक वर्षे अंदाजपत्रकातून दाखविण्यात येत होते. मात्र गेली दोन वर्षे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी हा रूपयाच गायब करून टाकलेला आहे. ताळतंत्र नसलेल्या या अंदाजपत्रकावर हसावे की रडावे तेच कळत नाही. तळागाळातल्या जनसामान्याचा संबंध येणाऱया सरकारच्या आरोग्य, कृषी, मस्य, जलस्तोत्र, वाहतुक, समाज कल्याण, सिव्हील सप्लाय, पंचायत, नगरपालिका, अशा अनेक खात्यासंबंधी आपले विधानसभेत लक्ष्यवेधी सुचनेच्या तासाला प्रश्न होते. परंतु ही विधानसभा जुलै महीन्यापर्यंत पूढे ढकलल्याने ते तसेच पडून राहीलेले आहे. त्यातील काही प्रश्न आपण मांडले, पण समाधानकारक उत्तरे देण्यास सरकारला अपयश आलेले आहे. जनसामान्याशी संबंध येणाऱया या खात्याचे भांडवल व महसूल यांची अर्थ खात्याकडून मिळालेली टक्केवारीची जंत्रीच आमदार सुदिन ढवळीकर यांनी परिषदेतून मांडली. प्रत्येक खात्यावर भाष्य करताना त्यांनी त्या खात्याची शस्त्रक्रिया केली. या सर्व प्रकार पाहील्यास एकतर मंत्री यावर कामच करीत नाही अथवा सरकारकडे पैसेचे नसल्याचे सिध्द होते. असा आरोप आमदार सुदिन ढवळीकर यांनी केला.
मुंबईतील गोवा सदन सुरू करण्याची मागणी
मुंबईत असलेले गोवा सदन दुरूस्तीकरीता गेली 7 वर्षे बंदच असल्याने गोव्यातील जनतेची गैरसोय होत आहे. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या कार्यकीर्दीत हे भवन उभारण्यात आले होते. त्याचा फायदा गोव्यातील गरजू जनतेला होत होता. टाटा व अन्य इस्पितळात जाणाऱयासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरत होते. विश्व हिंदू परिषदेतर्पे सोय केलेली असली तरी ती अपूरी पडत असल्याने आपण सरकारला हे गोवा सदन खुले करण्यासाठी विनंती केली असल्याचे आमदार श्री ढवळीकर यांनी सांगितले.









