पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत असल्याने निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत सरकार आगामी काळात इथेनॉलवर आधारीत ‘फ्लेक्स फ्यूल इंजिन’ला मान्यता देणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. सदरची योजना सुरु करण्यासाठी आणखीन तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची महिती आहे. यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमधून वाहनधारकांना दिलासा मिळावा म्हणून ही योजना लागू करण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे.
देशात सध्याच्या घडीला पेट्रोलच्या किमती 107 रुपये प्रति लिटरवर पोहोचल्या आहेत. यामुळे वाहनधारकांमध्ये मोठय़ा प्रमाणात असंतुष्टता निर्माण झाली आहे. जगभरात ब्राझील, अमेरिका आणि कॅनडासारख्या देशांमध्ये फ्लेक्स इंजिनची सुविधा उपलब्ध आहे. कृषी उत्पादनांवर आधारीत हे इंजिन चालते. बीएमडब्लू, मर्सिडीज व टोयोटासारख्या वाहन निर्मिती करणाऱया कंपन्या इंधनाच्या अन्य पर्यायाचा विचार करत असल्याचेही यावेळी मंत्री गडकरी यांनी सांगितले आहे.
इथेनॉल प्रति लिटर 60-62 रुपये
स्थानिक स्वरुपात उत्पादीत करण्यात येणारे इथेनॉल भारतासारख्या देशाला फायदेशीर ठरणार आहे. कारण सध्याला भारताला पेट्रोल व डिझेलसाठी कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून राहावे लागते आहे. नव्या इथेनॉल आधारीत फ्लेक्स इंजिनमुळे प्रदूषण कमी करण्यासह बचत होणार आहे. त्याचप्रमाणे आयातीवरचा भारही काहीसा हलका होणार आहे. एक लिटर इथेनॉलची प्रतिलिटर किमत 60 ते 62 रुपये इतकी आहे.
काय आहे फ्लेक्स-फ्यूल इंजिन?
फ्लेक्स-फ्यूल इंजिन हे एक किंवा अधिकच्या इंधनावर चालणारे इंजिन आहे. सामान्यपणे इथेनॉल किंवा मिथेनॉल इंधनाचे मिश्रण असणाऱया पेट्रोलचा वापर केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘20 टक्के इथेनॉलला पेट्रोलमध्ये मिसळण्याचे ध्येय प्राप्त करण्यासाठी वर्षाचा कालावधी निश्चित केला आहे. यामधून प्रदूषण कमी करणे आणि आयातीचे प्रमाण कमी करणे हा मुख्य उद्देश या मागे असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.








