प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव, बागलकोट जिल्हय़ातील सरकारी विश्रामधामावरील स्वयंपाकी व त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली आहे. या दोन्ही जिल्हय़ातील 30 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये बेळगाव जिल्हय़ातील 22 व बागलकोटमधील 8 जणांचा समावेश आहे. जिल्हा पोलीसप्रमुखांच्या सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे.
बेळगाव, बागलकोट जिल्हय़ातील वेगवेगळय़ा सरकारी विश्रामधामावर स्वयंपाकी म्हणून काम करणाऱया सात कुटुंबातील 38 जण रेल्वेने राजस्थानमधील अजमेर शरीफला गेले होते. 17 मार्च रोजी ते अजमेरला गेले. ख्वाजा गरीब नवाजच्या दर्शनानंतर तीन-चार दिवस ते तेथेच मुक्कामाला होते. नंतर पंतप्रधानांनी लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे हे 38 भाविक अजमेरमध्येच अडकले.
तब्बल 40 दिवस हुक्केरी, निपाणी, चिकोडी, अथणी, बागलकोट, बदामी परिसरातील हे 38 जण अजमेरमध्येच अडकून पडले. तेथील प्रशासनाने दिलेला पास घेऊन जीजे 1, बीव्ही 9986 या खासगी आरामबसमधून हे सर्वजण बेळगावच्या दिशेने आले. त्यासाठी त्यांनी 1 लाख 40 हजार रुपयांहून अधिक रक्कम बसच्या भाडय़ापोटी मोजली होती.
बेळगाव, बागलकोट जिल्हय़ातील भाविकांना घेऊन आलेली बस 3 मे रोजी कोगनोळी तपास नाक्मयावर पोहोचली. परराज्यातून येणाऱया प्रवाशांना रोखण्यासाठी कोगनोळीत पोलीस, महसूल विभागाने तपासणी वाढवली आहे. या बसमधील भाविकांकडे राजस्थान प्रशासनाने दिलेला प्रवासाचा पास होता. तरीही जिल्हा प्रशासनाने त्यांना परत पाठविण्याचा निर्णय घेतला.
वेगवेगळय़ा सरकारी विश्रामधामावर स्वयंपाकी म्हणून कार्यरत असल्यामुळे अनेक राजकीय नेत्यांशी या स्वयंपाक्मयांची जवळचे संबंध आहेत. त्यामुळे बेळगाव जिल्हय़ात प्रवेश करण्यात आपल्याला काही अडचण येणार नाही, अशी त्यांची भावना होती. ही भावना खोटी ठरली. कोगनोळी तपासनाक्मयावरून त्यांना परत पाठविण्यात आले. त्यावेळी काही राजकीय नेत्यांकरवी अधिकाऱयांवर दबाव आणण्याचाही प्रयत्न झाला. या प्रयत्नांना यश आले नाही म्हणून महामार्ग सोडून आडमार्गाने जिल्हय़ात प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला.
जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांना या हा प्रकार समजताच लागलीच बसमधील भाविकांना अडवून त्यांनी त्यांच्यावर नजर ठेवण्यास सांगितले. निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक संतोष सत्यनायक व त्यांच्या सहकाऱयांनीही याकामी महत्त्वाची भूमिका बजावली. या भाविकांना राजस्थानला परत पाठविण्याऐवजी संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवलेले बरे, असा विचार करण्यात आला.
तवंदी घाटातील गवाण येथील मोरारजी देसाई निवासी शाळेत त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवून त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले. 7 मे रोजी सर्व 38 जणांचे स्वॅब जमवून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले. रविवारी 38 पैकी बेळगाव, बागलकोटमधील 30 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने एकच खळबळ माजली आहे.
बाधितांमध्ये बेळगावातील तरुण
बेळगाव जिल्हय़ातील 22 व बागलकोट जिल्हय़ातील 8 असे एकूण 30 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या 22 मध्ये बेळगाव शहरातील काही तरुणांचाही समावेश आहे. प्रशासनाने यासंबंधीची अधिकृत माहिती दिली नाही. त्या सर्व 38 जणांना अजमेरमधून परतल्यानंतर लगेच संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यापासून इतरांना लागण होण्याचा टळला आहे, असे अधिकारी सांगत असले तरी क्वारंटाईनमध्ये असताना त्यांची भेट घेण्यासाठी व त्यांना जेवण देण्यासाठी म्हणून अनेक जण मोरारजी देसाई वसती शाळेत येत होते. त्यामुळे आता त्यांचाही शोध घेऊन त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
महामार्ग ठरतोय कोरोनाचा राजमार्ग
रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांवरून पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी तपासनाक्मयावर चौकशी वाढविण्यात आली आहे. अजमेरहून आलेल्या भाविकांची बस याच तपासनाक्मयावर अडविण्यात आली, त्यावेळी तब्बल आठ तास हे नाक्मयावर वावरत होते. काही केल्या अधिकाऱयांनी अजमेरहून आलेल्या बसला प्रवेश दिला नाही म्हणून ते तेथेच ताटकळत उभे होते. जिल्हा प्रशासनाने त्यांची जेवणाची व्यवस्था केली होती. जवळच असलेल्या एका हॉलमध्ये त्यांना जेवण वाढण्यात आले. याचवेळी बेळगावात प्रवेशासाठी सीमेवर उभ्या असलेल्या अनेकांशी त्यांचा संपर्क झाला असावा, असा संशय आहे. त्यामुळे महामार्ग आता कोरोनाचा राजमार्ग ठरतो आहे का, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.









