नवी दिल्ली :
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) चालू आर्थिक वर्षात शेवटच्या पतधोरण आढावा बैठकीत छोटय़ा बचत योजनांच्या व्याज दरात बदल करण्याचे संकेत दिले आहेत. पुढील तिमाहीत पब्लिक प्रोव्हीडंट फंड (पीपीएफ), नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी) आणि सुकन्या समृद्धी योजना सारख्या पोस्ट कार्यालयातील छोटय़ा बचत योजनांवरील व्याज दरात घट होण्याची शक्यता आहे. सरकारकडून प्रत्येक तिमाहीत छोटय़ा बचत योजनांवरील व्याज दर निश्चित केला जातो.
चलनविषयक धोरण समितीने केलेल्या निरीक्षणावरून अर्थव्यवस्थेत सतत घसरण होत असून, त्याचे परिणाम सतत नकारात्मक येत आहेत. रेपो दरात पुढे घट केली जाऊ शकते. याशिवाय केंद्रीय बँकने छोटय़ा बचत योजनांवरील व्याज दरात बदल करण्याची गरज व्यक्त केली आहे, असे आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. देशभरात जवळपास 12 लाख कोटी रुपये लघु बचत योजनांमध्ये आणि सुमारे 114 लाख कोटी रुपये बँकेत जमा स्वरुपात आहेत.