प्रतिनिधी / कोल्हापूर
नोव्हेंबर 2017 पासून प्रलंबित असलेला अकरावा द्विपक्षीय वेतन करार तत्काळ लागू करा, थकीत कर्ज वसुलीसाठी कठारे कायदा यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हय़ातील सरकारी बँकांनी शुक्रवारपासून दोन दिवसांचा संप पुकारला. लक्ष्मीपुरीतील बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने केली. बँकांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्हय़ातील सुमारे 200 कोटींची उलाढाला ठप्प झाली.
यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियनने सरकारी बँक अधिकारी कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. शुक्रवारी संपाच्या पहिल्या दिवशी देशभरातील 10 लाखांहून अधिक कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले. तर जिल्हय़ातील 30 सरकारी बँकांच्या 500 शाखांमधील सुमारे 5 हजार अधिकारी व कर्मचारी यासंपामध्ये सहभागी झाले.
लक्ष्मीपुरी येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या दारात सकाळी 11 वाजता अधिकारी कर्मचारी यांनी निदर्शने केली. यावेळी एआयबीईए झिंदाबाद झिंदाबाद, बँक कर्मचारी एकजुटीचा विजय असो, वेतनवाढ करार झालाच पाहिजे, आय.बी.ए.च्या वेळ काढू धोरणाचा धिक्कार असो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी संघटनेचे सुहास शिंदे, पांडूरंग वाइंगडे, रमेश मोहिते, परेश हटकर, निखिल कुलकर्णी, तेजस्विनी पाटील, रमेश कांबळे, सूर्यकांत कर्णिक आदींसह सरकारी बँकांचे अधिकारी, कर्मचारी मोठयासंख्येने उपस्थित होती.
बँक अधिकारी, कर्मचारी यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे–
– थकीत कर्ज वसुलीसाठी कठोर कायदा करणे
– नोव्हेंबर 2017 पासून प्रलंबित असलेला अकरावा द्विपक्षीय वेतन करार तत्काळ लागू करणे
– आरबीआय व इतर केंद्र सरकारी कार्यालयाप्रमाणे बँकांमध्ये देखील 5 दिवसीय आठवडा कामकाज पद्धत अवलंबण्यात यावी
– बँक कर्मचाऱयांसाठी असलेल्या कुटुंब पेन्शन योजनेत सुधारणा करणे व नवीन पेशन रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करणे.
– बँक अधिकाऱयांचे कामाचे तास निश्चित करावे.
बँका आजही बंद
प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी बँक कर्मचाऱयांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. शुक्रवारपासून या संपाला सुरवात झाली. शनिवारीही जिल्हय़ातील सरकारी बँकांचे अधिकारी, कर्मचारी संपामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील सरकारी बँका आजही बंद राहणार आहेत.








