मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचे आवाहन पशुसंवर्धन खात्याच्या विश्रामगृहाचे फोंडय़ात उद्घाटन
प्रतिनिधी/ फोंडा
कोटय़वधी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱया इमारत प्रकल्पांचा वापर जनतेसाठी योग्य प्रकारे होतानाच, विश्रामगृहासारख्या प्रकल्पातून महसूल निर्मितीचेही उद्दिष्टय़ पूर्ण झाले पाहिजे. राज्यात अनेक सरकारी प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत, ते वर्षभरात पूर्ण होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. पशुसंवर्धन खात्याच्या कुर्टी-फोंडा येथील प्रशस्त अशा विश्रामगृह प्रकल्पाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
राज्यातील काही सरकारी प्रकल्प उद्घाटनानंतर वापराविना पडून आहेत. सरकारी मालमत्तेचा अशाप्रकारे दुरुपयोग झाल्यास संबंधित खाते प्रमुखाला त्यासाठी जबाबदार धरावे लागेल, असा इशाराही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिला. बऱयाच सरकारी खात्यांची कार्यालये खासगी जागेत भरत असताना पांढरे हत्ती बनून राहिलेले असे प्रकल्प यापुढे सरकारला परवडणार नाहीत. जनतेची सोय व किमान महसूल उत्पादनासाठी त्यांचा उपयोग झाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. पशुसंवर्धन खात्यातर्फे छोटय़ा-मोठय़ा व्यवसायासाठी अनेक योजना असून राज्यातील युवक व शेतकऱयांनी जोडधंदा म्हणून या योजनांच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होण्याचे आवाहनही त्यांनी केले. पशुसंवर्धन व सहकार खात्याच्या माध्यमातून शेतकऱयांसाठी अनेक योजना असतानाही राज्यात दूध उत्पादन 30 टक्क्यांपुढे जात नाही, याचा विचार होणे गरजेचे आहे. बारावी शिकलेल्या विद्यार्थ्यांनी वेटरनरी साहाय्यक प्रशिक्षण सारख्या प्रशिक्षणवर्गासाठी पुढे येण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सरकारी प्रकल्पांचे काम पूर्ण करणाऱया कंत्राटदारांची बिले लवकरात लवकर चुकती करण्याची सूचनाही त्यांनी केली.
मुख्यमंत्र्याच्याहस्ते शिलान्यासचे अनावरण करुन व फित कापून विश्रामगृहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर, सहकारमंत्री गोविंद गावडे, फोंडय़ाचे आमदार रवी नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, कुर्टी पंचायतीचे सरपंच सुनिल खेडेकर, पशुसंवर्धन खात्याचे सचिव कुलदीपसिंग गांगर व संचालक डॉ. संतोष देसाई हे व्यासपीठावर उपस्थित होते. रु. 4 कोटी 70 लाख खर्चून प्रशस्त असे हे विश्रामगृह उभारण्यात आले असून त्यात विविध सुविधा आहेत. परराज्यातील सरकारी अधिकारी व राजकीय नेते, आमदारांना याठिकाणी निवासाची सोय तसेच विविध सरकारी प्रशिक्षणवर्ग व अन्य शासकीय कामासाठी त्याचा वापर होणार आहे.
फोंडय़ातील मलनिस्सारण प्रकल्प व रस्त्यांचा आढावा घेणार
फोंडय़ासारख्या मध्यवर्ती ठिकाणी योग्य जागेत हा प्रकल्प उभारण्यात आला असून सर्वदृष्टीने तो सोयिस्कर ठरणार आहे, असे मंत्री दीपक पाऊसकर म्हणाले. फोंडय़ातील मलनिस्सारण प्रकल्पाचे काम व रस्त्यांच्या कामासंबंधी येत्या आठवडय़ात संबंधित अभियंत्यांची बैठक घेऊन आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री गोविंद गावडे म्हणाले की, जनकल्याणकारी खात्यामध्ये सक्रिय व कार्यक्षम अधिकारी आणि कर्मचारी आवश्यक असून सरकारच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्याचा उद्देश त्यांच्यामुळे साध्य होऊ शकतो. सरकारी वास्तूंचा जनतेसाठी योग्य वापर होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. राज्या विकासासाठी केंद्र सरकारचा जस्तीतजास्त निधी उपलब्ध होण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱयांनी अधिकाधिक कार्यक्षमता दाखवण्याचे आवाहन त्यांनी केले.
आमदार रवी नाईक म्हणाले, सरकारी मालमत्तेचा योग्यप्रकारे वापर झाल्यास त्यातून जनतेला फायदा व महसुल निर्मितीसाठी मदत होऊ शकते. फोंडा हा तिसरा जिल्हा व्हावा याची पुनरुक्ती करीत सरकारला विरोधकांकडून हा प्रस्ताव नको असल्यास निदान सत्ताधाऱयांनी तसा प्रस्ताव आणावा. ज्यामुळे प्रशासन सामान्य जनतेच्या दारी पोहोचू शकेल. स्वागत व प्रास्ताविक डॉ. संतोष देसाई यांनी केले. पशुसंवर्धन खात्यातर्फे राबविण्यात येणाऱया विविध योजनांची त्यांनी माहिती दिली. खात्याच्या योजनांची माहिती देणाऱया डॉक्युमेंटरी फिल्मचे यावेळी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते अनावरण करण्यात आले.
खात्याचे संचालक डॉ. संतोष देसाई हे निवृत्त होत असून त्यांच्या सेवाकाळातील शेवटच्या दिवशी विश्रामगृह या महत्त्वाच्या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याहस्ते डॉ. देसाई यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांनी त्यांच्या सेवाकाळाची प्रशंसा करुन निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन कोलवेकर यांनी तर रामा परब यांनी आभार मानले.









