प्रतिनिधी/ मडगाव
सरकारी नोकऱयांसाठी पैसे घेतले जातात हे सर्वश्रुत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत विरोधकांकडे कसले पुरावे मागतात, जेव्हा त्यांच्याच सरकारातील उपमुख्यमंत्री असलेले चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांनीच सरकारी नोकऱयांसाठी पैसे घेतले जात असल्याची कबुली दिलेली आहे. त्यासंदर्भातील व्हिडियो व्हायरल झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांना जर चौकशी करायची असेल तर त्यांनी उपमुख्यमंत्री कवळेकर यांच्यापासूनच करावी, असा पलटवार प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.
काल शनिवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्ष जे आरोप करतात, त्यांनी नोकऱयांसाठी पैसे घेतले जातात, याचे पुरावे द्यावे, जर पुरावे दिले तर आपण कठोर कारवाई करीन असे म्हटले होते. विरोधकांनी विनाकारण आरोप करू सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू नये असे म्हटले होते. यावर गिरीश चोडणकर यांनी पलटवार करताना मुख्यमंत्री पुरावे कसले मागतात. जेव्हा त्यांचेच उपमुख्यमंत्री सरकारी नोकऱयांसाठी पैसे घेतले जात असल्याची कबुली देतात. हाच पुरावा मोठा आहे व मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यापासूनच सुरुवात करावी.
उपमुख्यमंत्री कवळेकर आपल्या केपे मतदारसंघात नोकरी मागणाऱया युवकांशी संवाद साधताना म्हणाले होते की, आपण सरकारी नोकऱया देण्यासाठी इतरांप्रमाणे पैसे घेत नाही. याचाच अर्थ असा होतो सरकारी नोकऱयांसाठी पैसे द्यावे लागतात. हा भक्कम पुरावा असून आणखीन पुराव्याची जरूरीच भासत नाही.
वीज खात्यात पाच वर्षे डेटा ऑपरेटर म्हणून काम करत होते, त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले होते. हे का घडले होते, याचा विचार मुख्यमंत्र्यांनी केला होता का ? योग्य प्रक्रिया न करताच डेटा ऑपरेटरच्या जागा भरण्यात आल्या होत्या. उच्च न्यायालयाच्या निवाडय़ानंतर सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिलेला आहे. तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी कोणताचा निर्णय घेतलेला नाही हा दुसरा पुरावा झाला.
उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्या मुलाला बनावट सर्टिफिकेटवर सरकारी नोकरी मिळते आणि नंतर न्यायालय त्यावर निवाडा देतात हा तिसरा पुरावा झाला. नोकरीसाठी ज्या परीक्षा घेतल्या जातात, या परीक्षा योग्यरित्या होत नाही. मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रकरणाची अगोदर चौकशी करावी तसेच सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे. त्याचे पालन करावे, असे गिरीश चोडणकर म्हणाले.









