राज्य सरकारचा आदेश : अनावश्यक खर्चाला फाटा देण्याचा प्रयत्न : भेटवस्तू, स्मृतिचिन्ह न देण्याची सूचना
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्य सरकारतर्फे आयोजित समारंभांमध्ये पुष्पगुच्छ, हार-तुरे, शाल आणण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या सूचनेवरून राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रवीकुमार यांनी मंगळवारी यासंबंधीचा आदेश दिला आहे. शिष्टाचाराच्या नावाखाली होणाऱया अनावश्यक खर्चाला फाटा देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
विधानसौध येथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांच्या बैठकीत पोलीस अधिकाऱयांनी आणणेले पुष्पगुच्छ नाकारत मुख्यमंत्र्यांनी हा अनावश्यक खर्च आहे. त्यामुळे यापुढे सभा-समारंभांमध्ये शिष्टाचाराच्या नावाखाली पुष्पगुच्छ, हार, शाल, फळांच्या टोपल्या आणण्याची आवश्यकता नाही. यापुढे ही पद्धतच नको, अशी सूचना त्यांनी केली. या बैठकीतच त्यांनी राज्य सरकारच्या मुख्य सचिवांनी यासंबंधीचा आदेश जारी करण्याची सूचना केली. त्यानुसार हा आदेश जारी करण्यात आला असून राज्य सरकारी आणि सरकारकडून चालविण्यात येणाऱया संस्थांमधील सभा-समारंभांमध्ये कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू, स्मृतिचिन्ह किंवा पुष्पगुच्छ, शाल, हार आणू नयेत. त्याऐवजी पुस्तके देता येतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
सभा-समारंभांमध्ये भेटवस्तू, स्मृतिचिन्ह आदी वस्तू देण्याऐवजी कन्नड पुस्तके देता येतील. या सूचनेचे काटेकोरपणे पालन झालेच पाहिजे. सरकारच्या सर्व खात्यांमधील कार्यालये आणि सरकारकडून चालविण्यात येणाऱया सर्व संस्थांमधील अधिकाऱयांना यासंबंधीची सूचना देण्यात आली आहे.
प्रथमच मंत्रिपदी शपथबद्ध झालेले ऊर्जा आणि कन्नड-सांस्कृतिक मंत्री व्ही. सुनीलकुमार यांनी आपले अभिनंदन करण्यासाठी आलेल्यांना आपल्याला भेटवस्तू, पुष्पगुच्छ आणू नका, असे आवाहन केले होते. त्याऐवजी एखादे पुस्तक आणा. आपल्या मतदारसंघातील ग्रंथालयांना देता येतील, असा सल्लाही त्यांनी दिला होता.
मुख्यमंत्र्यांकडून वडिलांच्या भूमिकेचे अनुकरण
राज्यात 1983 मध्ये निवडणुकीत विजय संपादन करून सत्तेवर आलेल्या जनता पक्षाचे नेते रामकृष्ण हेगडे यांच्या कार्यकाळातही सरकारी कार्यक्रमांमध्ये अनावश्यक खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी भेटवस्तू, हार आणण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. नंतर एस. आर. बोम्माई यांनी देखील हेगडे यांच्या पावलावर पाऊल ठेवत हार-तुरे, भेटवस्तू देण्याची प्रथा बंद केली होती. आता त्यांचे पुत्र बसवराज बोम्माई यांनी या भूमिकेचे अनुकरण केले आहे.
भू माफियांशी जवळीक असणाऱया अधिकाऱयांवर कठोर कारवाई
भू माफियांशी जवळीक असणाऱया पोलीस अधिकाऱयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आणखी मजबूत होणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. विधानसौध येथे मंगळवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
काही पोलीस स्थानके आणि पोलीस अधिकाऱयांनी भू माफियांशी हातमिळवणी केल्याचे आणि काही पोलीस स्थानके जमीन व्यवहाराची केंद्रे बनल्याची बाब आपल्या निदर्शनास आली आहे. अशा पोलीस अधिकाऱयांचा शोध घेऊन निलंबित करण्यात आले आहे. यापुढेही भू माफियांशी जवळीक असल्याचे आढळून आल्यास संबंधित पोलीस अधिकाऱयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची योग्य अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर असून यासंबंधीची माहिती पोलीस अधिकाऱयांना दिली आहे. कायदा-सुव्यवस्थेबद्दल सरकारने बाळगलेल्या उद्दिष्टांची माहिती पोलीस अधिकाऱयांना दिली आहे. पोलीस खात्याने आणखी जनस्नेही बनावे. आगामी काळातील आव्हाने, न्यायालयाच्या आदेशांचे पालन, कोरोना नियंत्रणातील जबाबदारी या बाबतीतही सूचना देण्यात आल्याचे बोम्माई म्हणाले.