मुख्यमंत्र्यांनी मागितली केंद्राकडे मदत
प्रतिनिधी / पणजी
राज्य सरकारसमोर सध्या अनेक आव्हाने असून सरकार आर्थिकदृष्टय़ा वाईट स्थितीतून जात आहे. पर्यटन व्यावसाय ठप्प झाला आहे. केंद्राकडून राज्याला मिळणाऱया जीएसटीतील निधीतही कपात झाली आहे. लॉकडाऊनमुळे व्यावसाय ठप्प झाले आहेत. दारुची दुकाने बंद राहिली. त्यामुळे सरकारला मोठय़ाप्रमाणात महसूलाला मुकावे लागले आहे. राज्य सरकारने आता केंद्राकडे आर्थिक मदत मागितली आहे.
राज्यात सध्या खाणबंदीनंतर पर्यटन व्यवसाय हा आर्थिक उत्पन्नाचा प्रमुख स्त्राsत मानला जात होता. मात्र कोरोनामुळे यंदाच्या हंगामात पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बुडाला त्यामुळे राज्य सरकारसमोर मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. सध्या खनिज वाहतूक सुरू झाल्याने सरकारला थोडी आर्थिक मदत मिळणार आहे. मात्र त्यातून आर्थिक संकट कमी होणार नाही.
केंदाकडून जीएसटीच्या रूपात गोव्याला दर महिन्याला सुमारे 255 कोटी मिळतात. मात्र यावेळी केंद्राकडून केवळ 177 कोटी मिळाले आहेत. केंद्र सरकारही आर्थिक संकटातून जात असल्याने पूर्ण निधी मिळण्याची शक्यताही कमीच आहे. त्यामुळे राज्य सरकारसमोरील आर्थिक संकट गढद होत चालले आहे. दरवर्षी गोवा सरकारला कॅसिनो व्यवसायामधून फी च्या रुपाने सुमारे 300 कोटीचा महसूल मिळतो. सध्या कॅसिनो बंद आहे. त्यामुळे लॉकडाउन काळातील कॅसिनो बंदीचा फटकाही सरकारला बसला आहे.
खाजगी उद्योगातील रोजगार संकट
लॉकडाऊनचा मोठा परिणाम सध्या राज्यातील उद्योगावर झालेला आहे. राज्यातील उद्योग महिनाभरापेक्षा जास्त काळ बंद राहिले आहेत. हल्लीच सरकारने उद्योग सुरू करण्यास मान्यता दिली आहे. मात्र उद्योग सुरू होऊन उत्पादन केले तरी निर्यात कशी करायची ही समस्या उद्योगासमोर आहे. व्यावसायातून अर्थिक उत्पन्न होत असल्याने कामगार कपातीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. त्याचबरोबर अनेक खाजगी उद्योगांनी कामगारांच्या पगारात 50 टक्के कपात केली आहे. त्यामुळे कामगार वर्गावरही मोठे संकट आले आहे.
अनेक कल्याणकारी योजना बंद होण्याची भीती
राज्य सरकार मोठय़ाप्रमाणात कल्याणकारी योजना राबवित आहे. या कल्याणकारी योजनावर महिन्याकाठी कोटय़वधी रुपये खर्च होतात. आता सरकारच आर्थिक संकटात सापडल्याने या कल्याणकारी योजना कशा राबवायच्या याची मोठी चिंता सरकारला आहे. गृहआधार, दयानंद सामाजिक सुरक्षा, लाडली लक्ष्मी या योजना कशा सुरू ठेवायचा हा प्रश्नही सरकारसमोर आहे.
राज्य आर्थिकदृटय़ा वाईट स्थितीत : मुख्यमंत्री
राज्याची आर्थिक स्थिती वाईट असून राज्यासमोर आर्थिक संकट आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारकडे आर्थिक मदत मागितली आहे. जीएसटी आणि व्हॅट वसूली पहाता राज्याची स्थिती वाईट आहे. पर्यटन ठप्प आणि अन्य गोष्टींचा परिणाम राज्याच्या तिजोरीवर झाला आहे. अन्य राज्यांमध्ये जशी वाईट स्थिती आहे तशी गोव्यातही आहे. केंद्र सरकारला याबाबतचे पत्र पाठविले आहे. राज्याची स्थिती केंद्र सरकारला कळवून मदतही मागितली आहे.









