ऑनलाईन टीम / नवी मुंबई
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएसी परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्याच्या तणावातून स्वप्निल लोणकर या युवकाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आत्महत्या करणाऱ्या स्वप्नील एमपीएससीच्या २०१९ च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र, त्याची मुलाखत दीड वर्षांपासून झाली नव्हती या तणावातून आत्महत्या केल्याचे त्याने मृत्युपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिले होतं. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला कसलीच लाज उरली नाहीये, अशी पोस्ट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
ही मुलाखती दीड वर्षांपासून झालेली नव्हती, त्याच मुलाखतींसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये आता मृत पावलेल्या स्वप्नील लोणकरचं नाव आलं आहे. याच मुद्यावरुनच आमदार पडळकर यांनी महाविकास आघाडीवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. सात जानेवारीला एमपीएससी परीक्षा पास झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती होणार असल्याने आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर याचं नाव यादीतून वगळण्यात आलेलं नसल्याने भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यानिमित्ताने एमपीएसीच्या कारभारावर बोट ठेवले आहे.
पडळकर यांनी सरकारला कसलीच लाज उरली नाहीये, अशी टीका केली आहे. यासंदर्भात बातमीचा पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला आहे. “आधी उत्तीर्ण होऊन दिड वर्ष झाली तरी मुलाखतीला बोलवलं नाही. म्हणून आत्महत्या करायला भाग पाडलं आता आत्महत्येचीही क्रूर थट्टा करतायेत. प्रस्थापितांच्या सरकारला कसलीच लाज उरली नाहीये. विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळणाऱ्या या गिधाडी प्रवृत्तीचा धिक्कार असो,” असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवड प्रक्रिया पुर्णत्वाकडे सरकवताना अवलंबलेली पद्धती म्हणुन ही प्रक्रिया पुर्ण केली अथवा नेमक्या कोणत्या कारणाने लोणकर या युवकाचे नाव प्रसिद्धी केले. यावर महाविकास आघाडी सरकार नेमकी काय प्रतिक्रीया देणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.








