आंदोलक ऊस उत्पादकांची मागणी, पणजीत मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करण्याचा प्रस्ताव फेटाळला
प्रतिनिधी/ सांगे
ऊस उत्पादक संघर्ष समितीने पुकारलेल्या धरणे आंदोलनाला तीन दिवस पूर्ण झाले असून सोमवारी संध्याकाळी समितीकडे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी मोबाईलवरून संपर्क साधून मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चेसाठी बोलविले. त्यानंतर समिती पदाधिकाऱयांनी यावर शेतकऱयांचे मत घेतले असता चर्चेसाठी पणजीत न जाता सरकारने सांगेतच बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱयांनी केली. या आंदोलनाला सर्व स्तरांतून वाढता प्रतिसाद मिळत आहे. एकूणच धरणे आंदोलन उग्र रूप धारण करण्याच्या मार्गाने जात आहे. शेतकऱयांच्या मागण्या रास्त असून सरकारने गांभीर्याने याकडे लक्ष देण्याची मागणी अनेक शेतकऱयांनी यावेळी बोलताना केली.
सोमवारी दिवसभरात माजी कृषिमंत्री व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, माजी आमदार वासुदेव मेंग गांवकर, ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई, हर्षद प्रभुदेसाई, गुरुदास गाड, अशोक वेळीप, बोस्त्यांव सिमॉईस, प्रशांत देसाई, भाटी सरपंच उदय नाईक, नेत्रावळीचे उपसरपंच अभिजित देसाई, वाडे सरपंच दुमिंगो बार्रेटो, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, नेत्रावळीचे माजी पंच उदय गावकर, उगेचे माजी सरपंच संतोष गावकर, बोडगेश्वर शेतकरी संघ-म्हापसा यांचे पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संजय बर्डे, गोंयचो राखणदारचे रामा काणकोणकर, सवेरा संस्थेच्या तारा केरकर यांनी धरणे आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थिती लावून शेतकऱयांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.
ऊस उत्पादक संघटना अध्यक्षांचा पाठिंबा
ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष देसाई यांनी आपण शेतकरी या नात्याने इतर काही सदस्यांसह उपस्थित राहिल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी वस्तुस्थिती कथन केली. आम्ही शेतकऱयांबरोबर असून सरकारने मागण्या मान्य कराव्यात, असे सांगून यावेळी त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. समितीतून बाहेर पडण्याचा विचार असून इतरांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले.
संजीवनीच्या जमिनीवर डोळा : सरदेसाई
आमदार सरदेसाई यांनी सांगितले की, सरकारला ऊस उत्पादक शेतकऱयांचे पडून गेलेले नाही. सरकारातील लोकांचा संजीवनी साखर कारखान्याकडे जी जमीन आहे त्यावर डोळा आहे, असा आरोप त्यांनी केला. राष्ट्रीय कृषी विकास योजनेखाली जो निधी उपलब्ध होतो त्यातून कारखाना व्यवस्थित चालवता येऊ शकतो. या सरकारला ऊस व शेतकऱयांप्रती संवेदनशीलता नाही. नव्या वर्षात शेतकरी रस्त्यावर येतात आणि हे सरकार अद्याप तोडगा काढत नाही हे दुर्भाग्य आहे, असे सरदेसाई म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारवर बरेच तोंडसुख घेतले.
सरकारने ‘इगो’ धरून बसू नये : चोडणकर
सरकारने ‘इगो’ धरून न बसता शक्मयतो लवकर तोडगा काढावा व शेतकऱयांना रु. 3600 भाव द्यावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या चोडणकर यांनी केली. मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांनी शेतकऱयांना जास्त त्रास करू नये तसेच इतर बाबतीत विनाकारण खर्च होणाऱया पैशांपैकी थोडे शेतकऱयांवर खर्च करावेत, असे ते म्हणाले. शेतकरी हा अन्नदाता असून सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी सरकारवर दबाव आणावा. आम्हाला या विषयात राजकारण करायचे नाही, असे सांगून त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱयांना पूर्ण पाठिंबा व्यक्त केला.
न्याय मिळेपर्यंत आंदोलन चालू ठेवणार
वासुदेव गावकर हे किसान मोर्चाचे अध्यक्ष असून त्यांनी हा विषय सरकार दरबारी लावून धरून सोडविणे गरजेचे असल्याचे मत बर्डे यांनी व्यक्त करून पाठिंबा जाहीर केला. दिवसभर आंदोलकांबरोबर आमदार प्रसाद गावकर ठाण मांडून होते. रात्री देखील ते आंदोलकांबरोबर मुक्काम करत आहेत. सर्व थरांतून धरणे आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय सोमवारी सर्वानुमते घेण्यात आला. गरज भासल्यास आंदोलन तीव्र करण्याचे ठरले. यावेळी सर्वांनी हात उंचावून त्यास प्रतिसाद दिला. दरम्यान, उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी शिष्टाई करण्याचे केलेले प्रयत्न कामी आले नाहीत. मात्र ते मुख्यमंत्र्यांकडे बोलून योग्य तो तोडगा काढतील अशी अपेक्षा अनेक जण बाळगून आहेत.