अखिल गोवा बसमालक संघटनेची मागणी
प्रतिनिधी/ पणजी
पर्रीकर सरकारने खाजगी बसमालकांसाठी त्यावेळी इंधनावर अनुदान आणि विमा योजना राबविण्यात आली होती. परंतु 2017 पासून या योजनेचा लाभ अजुनपर्यंत बसमालाकांना मिळालेला नाही. वाहतूक खात्याने लवकरात लवकर यात लक्ष घालून त्वरित हा विषय हाताळून आम्हाला आमच्या हक्काचे पैसै मिळवून द्यावे. अन्यथा धरणे, उपोषणास बसायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा अखिल गोवा खाजगी बसमालक संघटनेचे प्रमुख सुदीप ताम्हणकर यांनी दिला आहे.
पणजी येथील आझाद मैदानावर काल शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सुदीप ताम्हणकर बोलत होते. त्यांच्यासोबत गजेंद सावंत, रुपेश बांदोडकर, व केवल मयेकर उपस्थित होते.
कोरोनामुळे बसमालकांना अनेक समस्या
ही योजना सुरु झाल्यापासून वेळोवेळी निवेदन देऊन या योजना वाढवून घेण्यात आल्या आहेत. यावर्षीचे अजून नूतनीकरण झालेले नाही यासंदर्भात आम्ही दररोज आढावा घेत आहोत. यावर्षी कोरोनामुळे बसमालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. तसेच पेट्रोल, डिझेलचे दर वाढत आहेत. अशावेळी आम्ही या योजनेमार्फंत 3 रुपये प्रत्येक 1 कि.मी मागे आहे ते वाढवून 6 रुपये द्यावे आणि इन्शुरन्स 20 हजार रुपये आहे ते 30 हजार रुपये द्यावे, अशी मागणी सरकारकडे केली आहे, असे ताम्हणकर यांनी सांगितले.
वाहतूक संचालकांनी मागितली मुदत
यासंदर्भात आम्ही वाहतूक खात्याच्या संचालकाची भेट घेतली असून त्यांनी या योजनेसंदर्भात राहिलेल्या काही कामांसाठी 8 दिवसांची मुदत आमच्याकडे मागितली आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही 8 दिवस वाट पाहणार आहोत. तसेच यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे देखील आम्ही त्यांना सुपूर्द केली आहेत, असेही ताम्हणकर यांनी सांगितले.
बसमालकांनी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करु नये
काही बसमालकांचे गट सध्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहे. त्यांनी ती बंद करावे. येथे सरकार ‘डिव्हाईड ऍण्ड रुल’ नीती वापरत आहे. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, अणि आपल्या बसेस कंदबला देण्याचाही निर्णय घेऊ नये. कंदबची अवस्था देखील बिकट आहे. सध्या आमच्यावर विश्वास ठेवा. गणेशचतुर्थीपर्यंत सर्वांना योजनेचा जो लाभ मिळायचा आहे, तो मिळणार आहे, ताम्हणकर यांनी पुढे सांगितले.









