प्रतिनिधी / इस्लामपूर
सरकार कोरोनाचे कारण सांगून अधिवेशनातून पळ काढणार, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांच्याकडे अगोदरच कशी काय आली, हे माहीत नाही.सध्या कोरोना रुग्णांचे आकडे जे समोर येताहेत, ते त्यांना दिसत नसेल, तर काय म्हणावं, अशी खंत व्यक्त करतानाच अधिवेशन दि.१ ला सुरु होवून दि.१९ पर्यंत चालणार, असा विश्वास सामाजिक व न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
कोरोनाचे कारण दाखवून सरकार अधिवेशनापासून पळ काढणार, अशी टिका आमदार चंद्रकांत पाटील व सदाभाऊ खोत यांनी केली आहे. याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, मुंडे म्हणाले, देशात कोरोनाचे आकडे समोर येत आहेत, हे त्यांना दिसत नसेल, तर काय म्हणावं. राज्य, देश व जनतेच्या आरोग्यासाठी तडजोड नको, अशी भावना आहे. त्यामुळे पळ काढायचा विषय नाही. अजून अंतिम निर्णय कुठला झालेला नाही. पण दि.१ पासून अधिवेशन सुरु होवून दि. १९पर्यंत चालणार. पाटील यांच्याकडे अगोदरच सरकार पळ काढणार, अशी माहिती कशी काय आली ? हे माहीत नसल्याचेही त्यांनी सांगितले.








