काँग्रेसतर्फे साळगावात 25 रुपये प्रतिकिलो कांद्याची विक्री
प्रतिनिधी / म्हापसा
आज प्रत्येक गोष्टीत कांदा महत्त्वाचा आहे. मात्र आज कांद्याचा दर गगनाला पोचला आहे. नागरी पुरवठा खात्याचे मंत्रीही याकडे लक्ष देत नाही. भाजपचे शीतल व सावित्री कवळेकर यांनी हिम्मत असेल तर रस्त्यावर येऊन तुम्ही 20-25 रुपयांनी कांदा विका. गणेश चतुर्थी, दिवाळी येऊन गेली आता नाताळ येत आहे. आता जिल्हा पंचायत येत आहे. सरकार नागरिकांवर म्हणे दबाव घालीत आहे. तुम्ही भाजपला मतदान न केल्यास तुमचे गृहआधार आदी योजना बंद करणार. या योजना सरकारच्या नव्हे तर यासाठी आम्ही कर भरतो हे सरकारने विसरू नये असा इशारा काँग्रेसच्या प्रतिमा कुतिन्हो यांनी साळगाव येथे बोलताना दिला.
स्वस्त दरात साळगावात काँग्रेसच्या वतीने कांदे विकणे कार्यक्रम झाला त्यावेळी प्रतिमा कुतिन्हो बोलत होत्या. यावेळी साळगाव महिला अध्यक्ष सोनल मालवणकर आदी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. गोवा फॉरवर्डचे आमदार जयेश साळगावकर यांनी साळगावच्या नागरिकांकडे लक्ष द्यावे. आज साळगावचे नागरिक 25 रुपये किलोने कांदे घ्यायला रांगेत राहतात ही आमदारांना लाज आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारने याकडे लक्ष देऊन नागरिकांचा हा कांद्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी त्यांनी केली.
भाजप सरकार महिलांवरच छडी मारते- सोनल मालवणकर
साळगाव मतदारसंघाच्या काँग्रेस महिला अध्यक्ष सोनल मालवणकर म्हणाल्या की, भाजप सरकारने राज्यात आग लावली आहे. महिलांना आज घरात संसार करणे कठीण होऊन बसले आहे. कांद्याचे दर गगनाला भिडले आहे. सर्वत्र बेरोजगारी झालेली आहे. महिलांनी जी आपली पुंजी जमवून ठेवली आहे ती अशा या कोविडच्या काळात बाहेर काढावी लागत आहे. भाजप सरकार सदैव महिलांवरच छडी मारत आहे याचा आम्हाला बराच त्रास होतो याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या महिलांना साळगावात स्वस्त दरात कांदे विकावे लागते असे सोनल मालवणकर म्हणाल्या.
सरकारचा लोकहितावर भर नाही- ऍड. यतीश नाईक
ऍड. यतीश नाईक म्हणाले, भाजप सरकारचा लोकहितावर भर नाही. युवा वर्ग तळमळत आहे. महिलाही संतप्त झाल्या आहे. बाजारात कांदे, सामान्य कडधान्यास आग लागलेली आहे. अशा परिस्थितीत लोक जगणार कसे, भाजप सरकार कृषी क्षेत्रावरही नाराज आहे. जी बिले आणली आहेत ती लोकांवर कर बसविला आहे. लोकांना जगणे मुश्कील झाले आहे. कांद्याची भाववाढ केली आहे ती गंभीर आहे. हे दर सरकारने त्वरित कमी करावे अशी मागणी त्यांनी केली.
तुलीओ डिसोझा म्हणाले की, भाजपच्या सरकारला जनतेचे काहीच पडलेले नाही. त्यांना मोठय़ा प्रकल्पाचे पडले आहे. ते बाजूलाच ठेवून सरकारने जनतेच्या हिताकडे लक्ष द्यावे असे ते म्हणाले.
भाजप सरकारात गरीब लोक जाम झाले- भोलानाथ घाडी
काँग्रेसचे उपाध्यक्ष भोला घाडी म्हणाले की, आज सरकारला जनतेसा सांभाळून घेण्याची परिस्थिती नाही. प्रत्येकवेळी कांदे, नारळाचे दर वाढवून दाखवून दिले आहे. गरीब लोक त्रासात पडले आहे. सरकार सबसिडी देतात म्हणतात मात्र त्यांना काहीच पडले नाही. गरीब लोक थकलेले आहेत. याचा विचार सरकारने करावा असे घाडी म्हणाले.
कळंगुटचे गटाध्यक्ष राजेंद्र कोरगावकर म्हणाले की, राज्यात पेट्रोल, डिझेल, कांदे, वीज महाग केले आहे. गोरगरिबांचा सत्यानाश करण्याचा सरकारचा विचार आहे. फक्त मोठय़ा प्रकल्पाना वाव देऊन आपला विचार करण्याचा मनोदय सरकारला असल्याचे त्यांनी सांगितले. सिलीन डिसोझा यांचेही यावेळी भाषण झाले.









