प्रतिनिधी / मडगाव
दोन दिवसांपूर्वी आपण गोव्यातल्या ढासळलेल्या कोविड परिस्थितीवर उपाय काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ‘बोले तैसा चाले’ ही निती अंगिकारावी असा सल्ला दिला होता. परंतु काल बुधवारी स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या साखळी मतदारसंघातील पुलाचे उद्घाटन केल्यानंतर शेकडो लोकांसोबत पुलावरुन चालत गेले. लोकांना सामाजिक अंतर पाळण्याचा सल्ला ते आपल्या कृतीतुन देत होते का ? असा खोचक प्रश्न विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी विचारला आहे.
विरोधकांनी केलेल्या सुचनांना मुख्यमंत्र्यानी अशा प्रकारे प्रतिसाद द्यावा हे कल्पनेच्या बाहेर आहे. सरकारची संवेदनशीलता कोसळल्याचे हे उदाहरण आहे.
काल साखळी पुलावर राज्यात 144 कलम लागू असताना शेकडो लोक पुलावरुन मुख्यमंत्र्यांसोबत चालत असल्याची चित्रफीत सगळय़ा गोमंतकीयांनी पाहिली. कायद्याचे उल्लघंन करणाऱया सर्वांवर सरकारी अधिकारणीने ताबडतोब कारवाई करावी व 144 कलमाचा भंग केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी दिगंबर कामत यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून कायद्याचा भंग
जेव्हा राज्याचे मुख्यमंत्रीच कायद्याचा भंग करतात तेव्हा लोकांना चुकीचा संदेश जातो. लोक प्रतिनीधिनी जबाबदारीने वागणे या संकट काळात अत्यंत गरजेचे आहे.
आज लोक प्राणवायुसाठी तळमळत आहेत. पुढिल काळात गोव्यात प्राणवायुच्या उपलब्धते बद्दल प्रश्नचिन्ह असून, सरकारने आताच त्यावर विचार करणे गरजेचे आहे. इस्पितळातील खाटा भरलेल्या आहेत, औषधांसाठी लोकांना धावपळ करावी लागत आहे. दुर्देवाने सरकार उत्सव व उद्घाटने करण्यात व्यस्त आहे असे दिगंबर कामत म्हणाले. गोवा सरकारकडुन कोविड हाताळणी व्यवस्थापनाचा कृती आराखडा सरकार तयार करेल अशी लोकांची अपेक्षा होती. परंतु लोकांचे हाल कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यास सरकार सपशेल अपयशी ठरल्याचे कामत यांनी म्हटले आहे.









