सम्राटच्या शास्त्रिय संगीत स्पर्धेचे पर्व सोळावे, सात स्पर्धकासह पणजीत रंगणार अंतिम फेरी
प्रतिनिधी /फोंडा
सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य गोवा एक व सम्राट क्लब फोंडा आयोजित सम्राट संगीत सितारा या शास्त्रिय संगीतावर आधारीत स्पर्धेची महा अंतिम फेरी रविवार 19 सप्टे. रोजी सायं. 4 वा. पाटो पणजी येथील संस्कृती सभागृहात होणार असल्याची माहिती सम्राट सितारा स्पर्धेच्या अध्यक्षा राजश्री खांडेपारकर यांनी दिली.
फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सम्राट क्लब स्टेट वन चे अध्यक्ष डॉ. उदय कुडाळकर, सम्राट फोंडाचे अध्यक्ष ऍड. आर एस नाईक, सचिव अनिकेत भगत, सल्लागार अक्षय खांडेपारकर उपस्थित होते. अंतिम फेरीच्या सोहळय़ाच्या उद्घाटन सम्राट क्लब इंटरनॅशनल वर्किग कमिटीचे अध्यक्ष अवधूत सलत्री यांच्याहस्ते होणार असून प्रमूख पाहूणे म्हणून प्रसिद्ध गोमंतकीय गायिका हेमा सरदेसाई उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोविद भगत सांभाळणार असून लता नाईक त्याना सहाय्य करणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम रू. 10000, द्वितीय 7500, तृतीय 5000, उत्तेजनार्थ रू. 2500 ची दोन रोख पारितोषिके, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
अंतिम फेरीसाठी सात स्पर्धकांची निवड
सम्राट क्लबतर्फे सातत्याने ही स्पर्धा घेण्यात येत असून सद्या हे सोळावे पर्व आहे. कोरोना महामारीमुळेही सदर स्पर्धेत खंड पडू न दिलेला आहे. प्राथमिक फेरी ऑनलाईन माध्यमातून घेण्यात आली. यावेळी एकूण 44 स्पर्धकांनी सहभाग दर्शविला. स्पर्धेसाठी कारवार, बेळगाव, कोल्हापूर, सावंतवाडी, कुडाळ व महराष्ट्राच्या स्पर्धकांनी भाग घेतला. यावेळी प्राथमिक फेरीतून 20 स्पर्धकांची निवडीनंतर उपान्त्य फेरीअंती सात स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. चिन्मय कर्वे (सदाशिवगड कारवार), पल्लवी पाटील (ओल्ड गोवा), प्रचिती गोगटे (साखळी), जीवन पाटील (बेळगांव), अश्विनी अभ्यंकर (पाळी), केतकी घारपुरे (वास्को), मुक्ता मिसार (सांतापुझ फोंडा) या सात स्पर्धकांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेतील खासियत म्हणजे सम्राट सितारा पहिल्या पर्वाचे विजेते सचिन तेली हे आज शास्त्रिय संगीताचे धडे देणारे गुरू झाले असून त्याची शिष्या मुक्ती मिसार ही सम्राट सितारा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिलेली आहे.









