वार्ताहर / मौजेदापोली
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दापोली तालुक्यातील कर्देत पर्यटनाला आलेल्या 6 पर्यटकांपैकी एकजण समुद्रात बेपत्ता झाला आहे. सौरभ धाडवे (18) असे या युवकाचे नाव आहे. त्याच्यासोबत समुद्रात बुडणाऱया त्याच्या 5 मित्रांना स्थानिकांच्या सहाय्याने वाचवण्यात यश आले. सौरभचा समुद्रामध्ये शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यामुळे कोजागरी पौर्णिमेच्या आनंदावर विरजण पडले असून पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कोजागरीनिमित्त दापोली तालुक्यात सध्या पर्यटकांची गर्दी वाढली आहे. कार्तिक घाडगे (20), यश घाडगे (19), दिनेश चव्हाण (20), अक्षय शेलार (19), कुणाल घाडगे (30, सर्व रा. एकसर तालुका वाई, जि. सातारा) आणि सौरभ धावडे (18, रा. पाचगणी, महाबळेश्वर) असे 6 पर्यटक कर्दे येथे दुचाकी घेऊन आले होते. त्यांनी रविवारी दुपारी 12 च्या सुमारास किनाऱयाला टेंट उभारला व आपले साहित्य ठेवले आणि ते सहाहीजण पोहण्यासाठी समुद्रात गेले. त्यावेळी समुद्राला ओहोटी सुरू झाली होती. त्यामुळे पायाखालची वाळू निसटली आणि ते समुद्रात जाऊ लागले. त्यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी समोरच हॉटेलमध्ये असलेले ओंकार नरवणकर व मकरंद तोडणकर यांनी हा आवाज ऐकला आणि दोरी घेऊन तेथे तत्काळ धावत गेले. त्यावेळी त्यांनी दोरी समुद्रात फेकली आणि त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्याचवेळी सरपंच सचिन तोडणकर यांनी लाईफ जॅकेट आणले. दोरीच्या सहाय्याने बुडणाऱयांपैकी पाचजणांना वाचवण्यात यश आले. मात्र सौरभ धाडवे याचा हात सुटला व तो समुद्रात ओढला गेला आणि काही क्षणातच दिसेनासा झाला. यामुळे त्याच्यासोबत असलेल्या पाचजणांच्या चेहऱयावरचा आनंद मावळला.
याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, हर्णेचे बीट अंमलदार दीपक गोरे, कॉन्स्टेबल मोहिते आदी पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी, पोलीस पाटील सोनल खामकर हे घटनास्थळी दाखल झाले व घटनेची माहिती घेतली. या समुद्रात बुडालेल्या युवकाचा शोध पोलीस घेत आहेत.
पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
दापोली समुद्रकिनाऱयावर पर्यटक बुडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेबाबत कोणतीही उपाययोजना समुद्रकिनारी नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यामुळे दापोली तालुक्यात येणाऱया पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.









