बेतुल येथील मच्छीमारांची व्यथा
महेश कोनेकर/ मडगाव
शिनाणे, तिसरे, खुबे, कालवां, सुंगटा, बांगडे, इसवण, पापलेट, मोरी, शेवटे, तारले, वेल्ल्या, पेडवे ही मासळीची नावे कानावर पडली की, अस्सल गोमंतकीयांचे कान टवकारल्याशिवाय रहात नाही. ही नावे इतिहासजमा होणार का? असा प्रश्न उपस्थित होण्याजोगी परिस्थिती सद्या निर्माण झालेली आहे. सरकारने वेळीच उपाय योजना आखली नाही तर भावी पिढीला केवळ या नावावरच समाधान मानावे लागेल. या मासळीची चव काय असते याचा अनुभव देखील घेता येणार नाही, अशी खंत बेतुल येथील प्रसिद्ध मच्छीमार वासुदेव केरकर यांनी व्यक्त केली आहे.
वासुदेव केरकर यांनी आपल्या वडिलांचा व्यवसाय पुढे नेला आहे. मच्छीमारीचा 60 ते 65 वर्षाचा अनुभव पदरी असलेले केरकर हे ‘आर्यमेन’ किंवा ‘पागी’ म्हणून ओळखले जातात. ‘आर्यमेन’ म्हणजे समुद्रात फिरणारी मासळी कोणत्या प्रकारची आहे हे लांब पल्यावरून अचुक सांगणारे व्यक्तीमत्व. मासळी व्यवसायाचा गाढा अभ्यास असलेले वासुदेव सद्या समुद्रात मासळीचा दुष्काळ असल्याचे सांगतात. हा दुष्काळ असाच राहिला तर मच्छीमारांनी जगायचे कसे असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
ट्रॉलर बंद ठेवावे लागले
समुद्रात मासळीच सापडत नसल्याने वासुदेव व त्याचे बंधू लवू केरकर यांनी आपले ट्रॉलर बंद ठेवले आहेत. यंदा मासळी हंगामाच्या सुरवातीला अवघे काही दिवस त्यांनी मच्छीमारी केली. ती सुद्धा तंटपुजी होती. सुरवातीला चार-पाच टोपल्या मासे मिळायचे. नतंर धड दोन-तीन टोपल्यासुद्धा मासे मिळ नव्हते. त्यात भर म्हणून ट्रॉलरवर काम करण्यासाठी छत्तीसगडहून आलेले कामगारसुद्धा पळून गेले. समुद्रात मासळीच भेटत नाही अशा वेळी कामगारांना वेतन कुठून द्यायचे. विनावेतन कामगार कसे काय थांबतील असा यंदाच्या मासळी हंगामातील अनुभव देखील त्यांनी कथन केला.
अनेक मच्छीमार कुटुंबांची ही व्यथा
केवळ एका केरकर ‘फॅमिली’ची ही समस्या नाही. गोव्यातील बहुतेक सर्वच मच्छीमारांची ही व्यथा आहे. आज मोठे ट्रॉलर पाच-सहा दिवस समुद्रात थांबून मासेमारी करतात. त्यांना थोडी फार मासळी सापडते. तोच काय तो व्यवसाय आहे. उर्वरित मध्यम आकाराचे ट्रॉलरमालक पूर्णपणे हतबल झाल्याची माहिती त्यांनी दिली. अनेकांनी आपले ट्रॉलर विक्रीस काढले आहेत. अनेकांनी बँकांचे कर्ज घेतले आहे. त्याची परतफेड कशी करावी ही समस्या देखील मच्छीमार बांधवांना सतावू लागलीय. महाराष्ट्रात अनेक शेतकऱयांनी आत्महत्त्येचा मार्ग स्वीकारला तशी पाळी येथील मच्छीमार बांधवांवर येऊ नये व त्यासाठीच सरकारने आज मच्छीमार बांधवांसाठी उपाययोजना हाती घेण्याची गरज देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
‘शिनाणे’ इतिहास जमा…
एककाळ होता जेव्हा बेतुल किनारपट्टीत मोठय़ा प्रमाणात ‘शिनाणे’ भेटायच्या. बेतुलमधील शिनाणे हे संपूर्ण गोव्यात तसेच शेजारील राज्यांतही प्रसिद्ध होते, ते त्याच्या चवीमुळे. गेल्या काही वर्षापासून बेतुलमधील शिनाण्यांची संख्या घटू लागली व आत्ता तर ते इतिहासजमा झाल्याची माहिती वासुदेव केरकर यांनी दिली. शिनाण्याबरोबरच खुबे, तिसऱयादेखील चवीसाठी प्रसिद्ध होत्या. मात्र, त्यांचेही नामोनिशाण मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिनाण्यासंदर्भातील आपल्या आठवणी सांगताना वासुदेव म्हणाले की, आपण 11-12 वर्षाचा असताना वडिलांसोबत पागेल मारण्यासाठी समुद्रात गेलो होतो. तेव्हा समुद्रात शांतीलाल यांची बोट बुडाली होती व ही बोट काढण्याचे काम सुरू होते. या बुडलेल्या बोटीला प्रचंड शिनाणे झाले होते. ते वडिलांनी व आपण काढून मडगावच्या मार्केटात पाठवून दिले. त्यावेळी एका मोठय़ा टोपलीला साठ रूपये भाव मिळत होता. सलग दोन दिवस लागून हे शिनाणे काढले व त्यावर बऱयापैकी कमाई केली होती. पूर्वी ‘खेकडे’ मोठय़ा प्रमाणात यायचे. यंदा ते सुद्धा आलेले नाही अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
साळ नदीतील प्रदूषणाचा परिणाम
साळ नदी प्रदूषित झाल्याचा हा परिणाम असल्याचे ते सांगतात. वेर्णा येथून वाहणारी साळ नदी बेतुल येथे समुद्राला भिडते. या नदीचे प्रदूषण प्रचंड वाढले आहे. त्यावर सरकारने कोणतीच उपाययोजना आखलेली नाही. साळ नदीत सोडले जाणारे दुर्गंधी युक्त पाणी तसेच रसायन, यामुळे शिनाणे, खुबे, तिसऱया नामशेष होऊ लागल्याची माहिती त्यांनी दिली.
स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतर गोव्याच्या किनारपट्टी भागातच मोठय़ा प्रमाणात मासळी भेटायची. सुरवातीला होडीनेच मच्छीमारी केली जायची. जेव्हा मच्छीमार खात्याची स्थापना झाली व ट्रॉलर आले, तेव्हापासून मासळीचे प्रमाण घटू लागले. आज मासेमारी करण्यासाठी अत्याधुनिक स्वरूपाची यंत्रणा आलेली आहे. त्याद्वारे मासेमारी केली जाऊ लागल्याने, समुद्रातील मासेच संपल्यात जमा झाले आहे. त्यात भर म्हणून खोल समुद्रात ‘एलईडी’ लाईटचा वापर करून मासेमारी केली जाते. त्याचाही जबरदस्त परिणाम झालेला आहे. एलईडी लाईटचा वापर करून मासेमारी करण्यास बंदी घातल्याच्या बातम्या ऐकू येतात. पण, प्रत्यक्षात कुणीच कारवाई करीत नाही अशी खंत देखील केरकर यांनी व्यक्त केली.
पूर्वी पावसाळय़ात मासेमारी केली जात नव्हती. त्यामुळे अंडी घालणारी मासळी सुरक्षित रहात होती व बऱयापैकी मासळीची पैदास होत असे. पण, आता बंदीच्या काळात देखील इतर राज्यातील ट्रॉलर गोव्याच्या हद्दित घुसून मासेमारी करतात. चीन, पाकिस्तानचे ट्रॉलर देखील मासेमारीसाठी या ठिकाणी येतात. त्यामुळे मासे कसे शिल्लक राहणार असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला आहे. यावर कुठे तरी बंदी आली पाहिजे तरच येथील मच्छीमारीचा व्यवसाय तग धरेल अन्यथा मच्छीमारी व्यवसाय बंद पडण्यास वेळ लागणार नसल्याचे ठाम मत त्यांनी मांडले.









