समुद्रात कोटय़वधी टन माती ओतून डेन्मार्ककडून नवे शहर वसविण्यात येणार आहे. देशाच्या संसदेने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या नव्या शहरात 35 हजार लोकांना राहण्यासाठी घरे मिळणार आहेत. आधुनिक शहराच्या धर्तीवर येथे सर्व सुविधा उपलब्ध असतील. कृत्रिम बेटाची निर्मिती कोपनेहेगन बंदराला समुद्राच्या वाढत्या पातळीपासून वाचविण्यासाठी केली जात आहे.
लिनेटहोम नावाच्या या विशाल बेटाला रिंग रोड, भूयार आणि मेट्रोमार्गाच्या माध्यमातून डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगनशी जोडले जाणार आहे. याच ाआकार 2.6 चौरस किलोमीटर असणार आहे. या प्रकल्पावर चालू वर्षाच्या अखेरपर्यंत काम सुरू होण्याची अपेक्षा आहे.
समुद्रात सुरू केल्या जाणाऱया या प्रकल्पावरून पर्यावरणतज्ञांचे मत वेगळे आहे. कृत्रिम बेटाच्या निर्मितीच्या संभाव्य प्रभावावरून ते चिंतित आहेत. पर्यावरणवाद्यांच्या विरोधालाही तोंड द्यावे लागू शकते. तर या प्रकल्पाकरता सुरक्षेच्या मापदंडांवर विशेष लक्ष दिले जात आहे.
डेन्मार्कमध्ये निर्माण होणाऱया या नव्या बेटाच्या चहुबाजूला तटबंदी असणार आहे. यामुळे समुद्राची वाढती पातळी आणि वादळी लाटांपासून बंदराचे रक्षण करता येणार आहे. हा प्रकल्प वेळेत सुरू झाल्यास 2035 पर्यंत याचा बहुतांश हिस्सा तयार असेल.
पण युरोपीय न्यायालयासमोर या बेटाच्या विरोधात काही पर्यावरण समुहांनी याचिका दाखल केली आहे. या प्रकल्पावर काम सुरू झाल्यास याकरता कच्चा माल नेणारे सुमारे 350 ट्रक दररोज कोपेनहेगनमधून जातील, यामुळे शहरातील प्रदूषण वाढणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. नव्या बेटाचा आकार सुमारे 400 फुटबॉल मैदानांइतका असेल. याकरता सुमारे 8 कोटी टन मातीची गरज भासणार आहे.