समुद्रवैज्ञानिक डॉ. सतीश शेटय़े यांचे मत : आज 8 जून जागतिक महासागर दिन,मोठय़ा प्रमाणात प्रदूषण,गोव्यात अनेकांना समुद्रीजीवनाबद्दल जाणीव
प्रज्ञा मणेरीकर / पणजी
जगात औद्योगिक क्रांतीमुळे ग्रीनहाऊस वायूंमध्ये वाढ होत आहे, परिणामतः या वायूंच्या रेडिएशनमुळे समुद्रात तापमान वाढ होत आहे. तापमान वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी जागतिक पातळीवर उपाययोजना आणणे आवश्यक आहे. जगातील प्रत्येक देशाने एकत्र येऊन उपाययोजनांचा विचार करणे गरजेचे आहे. कार्बन डाय ऑक्साईड, मिथेनचा वापर कमी झाला तर काही प्रमाणात तापमान वाढीवर नियंत्रण येऊ शकते. यासाठी जागतिक पातळीवर याविषयी जागृती होणे फार महत्त्वाचे आहे, असे मत समुद्रवैज्ञानिक डॉ. सतीश शेटय़े यांनी जागतिक महासागर दिनानिमित्त दै. तरूण भारतच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
आज 8 जून म्हणजेच जागतिक महासागर दिन. महासागर ही आपल्याला लाभलेली नैसर्गिक संपत्ती आहे. त्याचे संरक्षण पेले नाही तर महासागरातील जलचरांना धोका निर्माण होऊ शकतो आणि त्याच्या विपरित परिणामाला आपल्यालाही सामोरे जावे लागेल. त्यामुळे महासागराच्या संरक्षणासाठी सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे
‘लाईफ ऍण्ड लाईव्हलीव्हूड’… यंदाची थीम
दरवर्षी विविध थीमवर हा दिन साजरा केला जातो. यंदा ‘लाईफ ऍण्ड लाईव्हलीव्हूड’ ही थीम आहे. या थीमद्वारे समुद्र हा मानवी जीवनात किती महत्त्वाचा आहे यावर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.
ग्रीनहाऊस वायूमुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण
सध्या औद्योगिक क्रांतीमुळे ग्रीनहाऊस वायू मोठय़ा प्रमाणात वातावरणाला प्रदूषित करत आहे. परिणामतः वातावरण बदल, हवामानात बदल परिणाम म्हणून मानवी जीवनाला भोगावे लागत आहे. कार्बनडाय ऑक्साईड, मिथेनसारख्या घातक वायूंमुळे समुद्राच्या वातावरणातही बदल होत आहे. तसेच समुद्राला सर्वात जास्त प्रमाणात इजा पोहोचवत आहे. या इजेमुळे तापमान वाढ त्यानंतर चक्रीवादळ यासारख्या अनेक नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. यासाठी या घातक वायूंवर आळा येणे महत्त्वाचे आहे. जर जगातील प्रत्येक देशाने याकडे लक्ष दिले तर समुद्रातील तापमान वाढीवर नियंत्रण येऊ शकते. समुद्राचे तापमान वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी जागतिक स्तरावर विचार होणे गरजेचे आहे असे डॉ, शेटय़े यांनी सांगितले.
गोव्यात अनेकांना समुद्रीजीवनाबद्दल जाणीव
दरवर्षी महासागर दिनाचा नागरिकांमध्ये समुद्राबद्दल जागरूकता आणणे हा उद्देश असतो. परंतु सध्याची परिस्थिती पाहता समुद्रातील जीव वाचविण्यापेक्षा त्यांना नष्ट करण्याचा ध्यास मानवाने घेतला आहे. समुद्र हा आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे. गोव्यात असे काही समुदाय आहेत ज्यांना समुद्री जीवन व त्याच्या महत्त्वांबद्दल जाणीव आहे आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. सरकारही त्यांना पाठिंबा देते. परंतु समुद्री जीवनाला हानी पोहचू नये यासाठी सर्व स्तरावर जागृती होणे आणि त्याप्रमाणे पाऊले उचलणे गरजेचे आहे असे शेटय़े सांगतात.
नद्या म्हणजे डम्पिंग ग्राऊंड म्हणून वापर केला जातो. त्यात कचरा, प्लास्टिक, कंपनी, इमारतीतील सांडपाणी नद्यांमध्ये सोडले जाते. या प्रदूषणामुळे समुद्री जीवनावर होतो. अशाप्रकारच्या कृत्यांवर आळा येणे ही काळाची गरज आहे. प्लास्टिकमुळे सूक्ष्म, तसेच मोठय़ा समुद्री मासळी तसेच जीव नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी विचार होणे गरजेचे बनले आहे. प्लास्टिकचा वापरही कमी प्रमाणात करण्यासाठी जागृती होणे आवश्यक आहे. प्लास्टिक वापरावर काही प्रमाणात बंदी आणणे आवश्यकता दिसून येत आहे. जर या गोष्टी झाल्या तर हवामान बदल, तापमान वाढीवर नियंत्रण येऊ शकते.
समुद्राचे संरक्षण करणे आवश्यक समुद्र हा मानवासाठी महत्त्वाचा आहे. आपली जीवनशैली यावर अवलंबून आहे. आपण जर स्वतःची जीवनशैली बदलली तर चक्रीवादळे, डोंगर, भूस्खलन यासारख्या नैसर्गिक आपत्तीवर नियंत्रण आणू शकतो. जर जीवनशैली बदलली नाहीतर यासारख्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी तयार राहणे महत्त्वाचे आहे असा इशारा शेटय़े यांनी दिला.









