मुस्लीम समुदायामध्ये अनोखी प्रथा
जगातील प्रत्येक देशात महिलांची स्थिती फारशी बरी नाही, कारण त्यांना मनाजोगा विचार करण्याचा, मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य नाही. महिलांच्या विरोधात होणारे अत्याचारांचे प्रमाण पाहता विकसित समाजाच्या तुलनेत मागास मानले जाणारे समुदाय अधिक चांगले असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आफ्रिकेतील एक समुदाय याचे उत्तम उदाहरण आहे. येथील मुस्लीम समुदायात महिलांना पुरुषांपेक्षा अधिक महत्त्व दिले जाते.

या समुदायाचे नाव टुआरेग असून तो सहारा वाळवंटात आढळून येतो. उत्तर आफ्रिकेत माली, नायजर, लीबिया, अल्जीरिया अणि चाड यासारख्या देशांमध्ये या समुदायाचे अस्तित्व आहे. या समुदायाची एकूण लोकसंख्या सुमारे 20 लाखाच्या आसपास आहे. हा एक मुस्लीम समुदाय असला तरीही याच्या मान्यता इस्लामिक संस्कृतीपेक्षा अत्यंत वेगळ्या आहेत.
या समुदायात महिला नव्हे तर पुरुष स्वत:चे अंग निळ्या रंगाच्या पेहरावाद्वारे झाकत असतात. पुरुषांना अनेकदा वाळवंटातून प्रवास करावा लागत असल्याने ते वाळू अन् उन्हापासून वाचण्यासाठी हे पाऊल उचलतात. या समुदायात महिलांना कुटुंबप्रमुख मानले जाते. जर पतीसोबत घटस्फोट झाल्यास त्याची पूर्ण संपत्ती महिला स्वत:कडे बाळगू शकतात. या समुदायात घटस्फोटाला वाईट मानले जात नाही. घटस्फोटानंतर महिलेचे कुटुंबीय आनंद व्यक्त करत असतात.
टुआरेग समुदायाचे लोक अत्यंत स्वाभिमानी असतात. जर त्यांना पाणी विचारण्यात न आल्यास ते स्वत:हून कधीच त्याची मागणी करत नाहीत. स्वत:ची प्रकृती बिघडली तरी ते स्वत:चा स्वाभिमान जपतात. अशाच प्रकारे एका प्रथेनुसार पुरुष स्वत:च्या पत्नीव्यतिरिक्त अन्य कुठल्याही महिलेसमोर जेवत नाहीत.









