शिक्षक संघाच्या अमृतमहोत्सव सोहळय़ाप्रसंगी माजी आमदार दिगंबर पाटलांचे आवाहन
प्रतिनिधी / खानापूर
शिक्षकी सेवेतून मिळालेल्या समाजसेवेचा वसा लोकशिक्षक होऊन निवृत्तीनंतरही शिक्षकांनी कायम ठेवला पाहिजे. माजी शिक्षकांनी सेवाकाळात विध्यार्थ्यांचे भवितव्य घडविल्यानंतर निवृत्तीनंतर समाज कल्याणाची तळमळ अंगी बाळगणे गरजेचे आहे. समाजाला योग्य दिशेने नेण्यासाठी निवृत्त शिक्षकांनी लोकजागरणाचे कार्य हाती घ्यावे, असे आवाहन माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले. खानापूर तालुका मराठी प्राथमिक निवृत्त शिक्षक संघाच्या अमृतमहोत्सव सोहळय़ाप्रसंगी बोलत होते. संघाचे अध्यक्ष डी. एम. भोसले अध्यक्षस्थानी होते.
यावेळी प्रा. शंकर गावडा म्हणाले, शिक्षकाला ज्ञानदानाशिवाय कोणताही धर्म नाही. हे प्रमुख तत्त्व शिक्षकांनी लक्षात ठेवले पाहिजे. शिक्षक हा समाजाचा सृजनशील घटक आहे. राष्ट्रशिल्पकार असणाऱया शिक्षकांनी आपल्या पेशाचा सार्थ अभिमान बाळगून निवृत्तीनंतरचा वेळ समाजाच्या जडणघडणीकरिता खर्च करावा. भू-विकास बँकेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील म्हणाले, शिक्षण ही कोणत्याही राष्ट्राची सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. विद्यादानाचे पवित्र कार्य करणारे शिक्षक त्याग, प्रेम, वात्सल्य, चारित्र्य संपन्नता व प्रेरणेचे प्रतीक आहे.
म. ए. समितीचे कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे म्हणाले, शिक्षकी पेशाची ज्या दिवशी नोकरी होईल. त्या दिवशी शिक्षण संपेल, शिक्षकांच्या कार्याची पोचपावती त्यांच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशावर अवलंबून आहे.
पंच्याहत्तरी ओलांडलेल्यांचा सत्कार
कार्यक्रमात वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेल्या पुंडलिक वळलू पाटील, तुकाराम गणपती गावडे, चंद्रकांत श्रीपाद कारेकर, रामचंद्र कल्लापा मंगमुळी, कल्लापा धाकलू बेदरेकर, हणमंत मष्णू सुर्वे, गणेश गावडू पाटील या निवृत्त शिक्षकांचा शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सत्कार केला. यावेळी विवेक गिरी, व्ही. एम. बनोशी, विठ्ठल गुरव, आबासाहेब दळवी, सी. एस. पवार, ए. बी. मुरगोड आदी उपस्थित होते. शंकर गावडा, चन्नापा गुरव, प्रवीण पाटील, पद्मश्री पाटील या नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांचाही सत्कार करण्यात आला. प्रारंभी संस्थापक दिवंगत तातोबा पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी गोपाळ हेब्बाळकर यांच्या हस्ते स्वागत केले. सूत्रसंचालन तुकाराम पाटील तर सचिव अनंत पाटील यांनी आभार मानले.